
मुंबईवरील ‘26/11’च्या दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबला जिवंत पकडणाऱया पोलिसांच्या पथकातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मंगेश अनंत नाईक आणि इतर 14 पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या शौर्याचा सन्मान करण्यासाठी त्यांना किमान एक टप्पा पदोन्नती देण्याची मागणी शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी आज विधासभेत औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे केली.
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील अतिरेकी कसाबला पकडताना पोलीस पथकातील तुकाराम ओंबळे शहीद झाले. या अतिरेक्याला जिवंत पकडणाऱया 14 पोलीस अधिकाऱयांचा व अंमलदारांचा राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक व पोलीस पदक देऊन सन्मान करण्यात आला. या पोलिसांना दरमहा काही रक्कम अदा केली आणि प्रवास सवलत देण्यात आली. याव्यतिरिक्त काही देण्यात आले नाही. या पथकातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मंगेश अनंत नाईक व त्यांचे पोलीस सहकारी नजीकच्या काळात सेवानिवृत्त होणार आहेत. या पोलीस अधिकाऱयांनी जिवाची पर्वा न करता कर्तव्यनिष्ठsने कसाबला जिवंत पकडले. कोणतेही शस्त्र नसताना हातात केवळ काठी असतानाही त्यांनी कसाबला पकडले. ऐतिहासिक शौर्य गाजवणारे 14 पोलीस अधिकारी व अंमलदारांची कर्तव्यनिष्ठा लक्षात घेऊन सरकारने त्यांना किमान एक टप्पा पदोन्नती देऊन त्यांच्या शौर्याचा योग्य सन्मान करावा. त्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याची मागणी सुनील प्रभू यांनी औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे केली.



























































