
शिरूर तालुक्याच्या पश्चिमेकडील मुंजाळवाडीतील पाण्याने भरलेल्या विहिरीत 2 दिवसांपूर्वी पडलेल्या एका कोल्ह्याला वन विभागाच्या रेस्क्यू टीमने जीवदान दिले.
मुंजाळवाडीतील अशोक हिलाळ यांच्या शेतानजीक भरपूर पाणी असणाऱ्या एका मोठ्या विहिरीत सुमारे दोन दिवसांपूर्वी 6 महिने वयाचे कोल्ह्याचे पिल्लू पडले होते. अडगळीत असलेल्या विहिरीवर शेतकरी हिलाळ हे फेरफटका मारण्यासाठी गेले असताना विहीरीतील पाण्यात पोहून दमलेला कोल्हा कपारीवर बसलेला आढळला. त्यांनी तात्काळ वन विभागास कळविले असता वन विभागाच्या रेस्क्यू टीमने तातडी हालचाल करत बुधवारी सायंकाळी मुंजाळवाडीत पोहचत या कोल्ह्याला विहिरीतून सुरक्षित बाहेर काढले. यानंतर त्याला निसर्गाच्या सानिध्यात सोडून देण्यात आले आहे.
































































