वर्दीतला बाप माणूस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> संजीवनी धुरी-जाधव

पिंपरी–चिंचवडचे पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर. कर्तव्यदक्ष खाकी गणवेशाआड असलेल्या हळव्या, संवेदनक्षम जाणिवेची कहाणी…

कोण म्हणतं खाकी वर्दीतल्या माणसाला माणुसकी नसते…कोण म्हणतं तो भावनाशून्य असतो…खाकीतला पोलीसही एक माणूसच असतो. सर्वसामान्यांप्रमाणे त्यालाही भावना असतात आणि त्याच्याही मनाचा एक कोपरा हळवा असतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे संभाजीनगरचे पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर. अनेक गुन्हेगारांना बेडय़ा ठोकलेला हा भला माणूस वेश्या व्यवसायातून सोडवलेल्या एका दहा वर्षांच्या मुलीचे पालकत्व स्वीकारून तिचा पिता बनून सांभाळ करत आहे. खाकीतल्या या ‘बाप’माणसाला एक सलाम व्हायलाच हवा.

मनीष कल्याणकर हे संभाजीनगरचे पोलीस निरीक्षक. त्यांची आता पुण्यात पिंपरी-चिंचवड देहुरोड पोलीस स्थानकात त्यांची बदली झाली आहे. ‘निशा’ असे त्यांच्या या लेकीचे नाव आहे. तिच्या एका हसण्याने मन प्रसन्न होतं. ती अल्लड आहे…खोडकर आहे…हसरी आहे आणि माझी लाडकी आहे…अभ्यासात फारशी रमणारी नसली तरी तिला नृत्यावर थिरकायला आवडतं. आता ती सातवीला आहे. आम्ही संभाजीनगरला राहतो, पण अलीकडे माझी बदली पिंपरी-चिंचवडला झाली आहे. त्यामुळे तिचा दररोज माझ्यासाठी व्हिडीओ कॉल असतो…अशी ही माझी लाडकी लेक निशा. बोलायला फार अवघड वाटतं, आता ती आठवणही नको इतक्या त्या वेदनादायी आठवणी असल्याचे मनीष कल्याणकर भावनाविवश होऊन बोलू लागतात. पुढे ते सांगतात की, 2016मध्ये मी जवाहरनगरला होतो. त्यावेळेला माझ्याकडे निशाच्या अपहरणाची केस आली होती. तिच्या आई-वडिलांची परिस्थिती हलाखीची होती. तिच्या आईने शाळेतून घरी येत असताना मुलगी गायब झाल्याची पोलिसांत तक्रार नोंदवली. चौकशी केली असता आमच्या तपासात त्या मुलीला मुंबईत आणल्याचे कळले. आम्ही तिला शोधून काढले पण ज्या अवस्थेत ती सापडली तेव्हा तिची अवस्था फार भयंकर होती. संपूर्ण अंगावर सिगारेटचे चटके दिले होते. माणसांना पाहून ती अक्षरशः भीतीने उडत होती. त्यावेळी आरोपीला ओळखणं फार मुश्किल झालं असतं. डॉक्टर बोलले तिची अवस्था फार बिकट आहे. अशावेळी मी आणि माझ्या पत्नीने तिची तब्येत बरी होईपर्यंत तिला घरी नेण्याचा निर्णय घेतला. तिचा एक- दीड महिना सांभाळ केला. आमच्यात कुटुंबात ती सामावून गेली.

दीड महिन्यानंतर तिने आरोपी ओळखले. आरोपींना पुढे शिक्षाही झाली. त्यात दोन महिला आणि एक पुरुष होता. तिला वेश्या व्यवसायात विक्रीसाठी नेले जात होते, अशी माहिती त्या आरोपींकडून कळली. पण त्या दीड महिन्यात तिने आम्हा सगळ्यांनाच आपलंस केलं. त्यामुळे तिला मी आणि माझ्या पत्नीने दत्तक घ्यायचे ठरवले. तिच्या आई-वडिलांशी बोललो, पण मला दोन मुलं आहेत त्यामुळे कायद्याने मी तिसरे अपत्य दत्तक घेऊ शकलो नाही. पण तिच्या आई-वडिलांच्या संमतीने ती आमच्याचकडे असते. तिचा सांभाळ मी करत असल्याचे ते अभिमानाने सांगतात.

निशा मला सापडण्याचे कारण मी लहान मुलांबाबत फार हळवा आहे. माझ्याकडे ज्या केस आल्या आहेत त्याबाबत मी थोडा भावनिकच असतो. काही केस आमच्या दृष्टिकोनातून खोटय़ा असतात, पण ज्या खऱया असतात त्या कळतात. त्यांच्यासाठी मी प्रयत्न करत असतो. काही मुलींना मी रोजगार मिळवून दिला. काहींच्या मुलींची फी भरतो. या साऱया गोष्टी मला आंतरिक सुख देतात. माझ्या मनाला जे चांगलं वाटतं तेच करतो. यामुळे मला आतून समाधान वाटतं. त्याला मी माझा स्वार्थ समजतो. समाजात अशा घटना घडू नयेत यासाठी पोलिसांकडून जागृती हा सगळ्यात मोठा उपाय असल्याचे मनीष कल्याणकर यांना वाटते.

ती माझीच मुलगी
निशाला नृत्य आवडते. त्यामुळे शिक्षणाबरोबरच ती नृत्याचेही धडे घेत आहे. आज ती पूर्णपणे तो प्रसंग विसरू शकली त्याचं समाधान आहे. फार मुश्किलीने ती विसरली आहे. तो प्रसंग आठवला तरी मला फार यातना होतात. तिला आनंदी पाहून खूप बरे वाटते. माझ्याएवढेच माझ्या पत्नीचेही तिच्यावर तेवढेच प्रेम आहे. ती आईपेक्षा तिची मैत्रीण जास्त आहे. मला ती पप्पा बोलते. तिच्या आई-वडिलांना अधूनमधून भेटायला जाते. कायद्यामुळे आम्ही तिला दत्तक घेऊ शकत नसलो तरीही ती माझीच मुलगी आहे.

मुलांशी मैत्री करा
आई-वडिलांनी मुलांशी मैत्री करावी. त्यांच्यासोबत वेळ घालवावा. संवाद साधावा. जसे मुलं लहान असताना त्यांच्या वयात येऊन आपण त्यांच्याशी बोलतो अगदी तसेच त्यांच्याशी त्यांचे मित्र-मैत्रीण होऊन खेळा. मुली आणि आईचे नातेही मैत्रिणीसारखे असले पाहिजे. तिला अनेक गोष्टी कळल्या पाहिजेत. आईच्या अनुभवातून ती आणखी शिकते. यावेळी आई आणि मुलीचे अतूट नाते असायला हवे तरच ती आईशी मनमोकळी होऊ शकते.

तिच्यासाठी भविष्यात काय?
तिला नृत्य करायला आवडतं. त्यामुळे तिच्या आवडीनुसार नृत्य क्लासला जाते. तिला मी अभिनय क्लासलाही पाठवणार आहे. तिच्या आवडत्या क्षेत्रात ती जाईल.

– [email protected]