
>> मीना आंबेरकर, [email protected]
सणावाराच्या निमित्ताने संपूर्ण स्वयंपाक घराची स्वच्छता निघतेच. पण हाच स्वच्छतेचा हात रोज फिरला की, अन्नपूर्णेची ही कर्मभूमी नेहमीच लखलखत राहते.
गेल्या आठवडय़ाच्या लेखात आपण स्वयंपाकघरातील ओटा कसा स्वच्छ ठेवावा हे पाहिले. या लेखात आपण एकूणच स्वयंपाकघर कसे स्वच्छ ठेवावे हे पाहणार आहोत. स्वयंपाकघरातील सिंक, बेसिन, मोरी खूपच स्वच्छ हवी. त्यात पडणारे खरकटे किंवा तयार होणारे शेवाळ वेगळे काढून घ्यावे. जुना टूथब्रश वापरून शेवाळलेल्या कडय़ा वॉशिंग सोडा किंवा हायड्रोक्लोरिक ऑसिडने घासून घ्याव्यात. त्यामुळे त्यातील तेलकटपणाही जातो. तेलकट डाग काढण्यासाठी एक चमचा वॉशिंग सोडा घातलेले पाणी वापरून पुसावे. म्हणजे डाग जातील.
स्वयंपाकघरात हात, जमीन व भांडी पुसण्यासाठी स्वतंत्र फडके, डस्टर किंवा नॅपकिन असावेत. हे कपडे गरम पाण्यात साबणाने स्वच्छ धुवावेत. महिन्यातून एकदा डेटॉल किंवा साबणाच्या पाण्यात उकळून घ्यावेत.
खरकटी भांडी स्वच्छ धुऊन, घासून व पुसून घ्यावीत. त्यांना राख, पावडर किंवा खरकटे लागलेले नसावे. तसे असल्यास अन्न नासू शकते. चमचे, पेले, जेवणाची ताटे स्वच्छ करण्यासाठी लिक्विड सोप वापरावा. त्यामुळे भांडे करकरीत स्वच्छ होते. तसेच भांडी पुन्हा वापरण्यापूर्वी विसळून घ्यावीत. भाज्या चिरून किंवा स्वयंपाकाला लागणारी सर्व तयारी करून फोडणी करावी, नाहीतर अनवधानाने तेल जळते व पदार्थ खराब होतो. स्वयंपाक सुरू करण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावेत. हात पुसण्यास जवळ एक नॅपकिन ठेवावा. कपडे खराब होऊ नयेत म्हणून ऍप्रन बांधावा.
स्वयंपाकघरात शक्यतो कचऱयाचा डबा ठेवू नये. ठेवायचा असल्यास त्यावर झाकण असावे. त्याच्या आत प्लॅस्टिकची पिशवी लावून कचरा टाकावा. म्हणजे पिशवी उचलून कचरा टाकणे सोपे जाते.
टिप्स
– गवारीची भाजी करताना भाजी शिजण्यासाठी पाव वाटी दूध घालावे. भाजीचा उग्रपणा कमी होतो व चव चांगली लागते.
– कांदेपोहे करताना कांदा फोडणीस टाकल्यावर लिंबू व हळद घालावी. पिवळा रंग चांगला राहतो.
गाजराचे वडे
साहित्य – 3 वाटी चणाडाळ, अर्धा किलो गाजर, 5/6 हिरव्या मिरच्या, 2 मध्यम कांदे, कढीपत्ता चिरून, कोथिंबीर चिरून, हळद, मीठ, तिखट चवीप्रमाणे, चिमूटभर हिंग.
कृती – गाजरांची साले काढून बारीक किसावीत. कांदेही बारीक चिरून घ्यावेत. डाळ 4-5 तास भिजवून सरसरीत वाटावी. मिरच्याही वाटाव्यात. सर्व साहित्य एकत्र करावे. ओल्या कपडय़ावर वडे थापून भरपूर तेलात तळावेत.
कटाची आमटी
साहित्य – पुरणपोळीला चण्याची डाळ शिजत ठेवली की, वर पाणी येते. त्यालाच कट म्हणतात. हा कट वरचेवर काढून घ्यावा. कट 8 वाटय़ा, अर्धी वाटी चिंचेचा कोळ, मोठय़ा लिंबाएवढा गूळ, प्रत्येकी दीड टीस्पून धणे व तिखट पूड, काळा मसाला 1 टे. स्पून, फोडणीसाठी हळद, हिंग, मोहरी, तेल, चवीनुसार मीठ, 1 टे. स्पून बेसन, किसलेले खोबरे 1 टे. स्पून.
कृती – कटात गोळी न होता बेसन कालवा. त्यात चिंचेचा कोळ व गूळ घाला. फोडणी करा. त्यात कट व ठरलेले जिन्नस घाला. उकळी द्या. आवडत असल्यास त्याऐवजी आले-लसूण वाटून 1 टीस्पून व गरम मसाला घालावा. तेव्हा धणेपूड व काळा मसाला गाळून सर्व कृती वरीलप्रमाणे करावी.
पुरणपोळी
साहित्य – 1 किलो चणाडाळ, पाऊण किलो पिवळा गूळ, 1 वाटी साखर, 2 वाटय़ा कणीक, 1 वाटी मैदा, 1 वाटी रवा, वेलची पूड, जायफळ पूड, 1 वाटी तेल.
कृती – चणाडाळ धुऊन आधणाच्या पाण्यात सोडावी. थोडे तेल व हळद घालून मऊ शिजवावी. डाळ चांगली शिजली की, चाळणीत उपसावी. पाणी निथळले की, चाळणीतील डाळ पुन्हा पातेल्यात टाकून त्यात 1 पेलाभर पाणी टाकावे व पुन्हा ते पाणी गाळून घ्यावे. डाळीचे पाणी कटाच्या आमटीसाठी वापरावे. निथळलेली डाळ पातेल्यात घालावी. गूळ किसून त्यात मिसळवावा आणि पुन्हा पुरण शिजत लावावे. शिजून घट्ट होत आले की, साखर घालावी. साखर विरघळली आणि पुन्हा पुरण घट्ट झाले की, गॅस बंद करावा. पुरण यंत्रातून पुरण वाटून घ्यावे. पुरण शिजत असताना एकीकडे परातीत रव्याचा गोळा भिजवावा. अर्ध्या तासाने मैदा, कणीक घालून पीठ भिजवावे. फार घट्ट किंवा फार सैल नको. पीठही मुरत ठेवावे. पोळय़ा करतेवेळी थोडे थोडे तेल घेऊन कणीक खूप तिंबावी. कणकेचा गोळा ओढल्यास तार येईल इतकी कणीक तिंबावी. नंतर या पिठाचा लहान लिंबाएवढा गोळा घेऊन त्याची वाटी करावी. त्यात वाटीपेक्षा दुप्पट पुरण घालावे व पारीचे तोंड बंद करून पिठीवर पोळी वाटावी. सपाट तव्यावर पोळय़ा भाजून घ्याव्यात.

























































