
पदावरून काढून टाकण्याविरोधात आयसीआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि माजी व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका गुरुवारी फेटाळण्यात आली. न्यायाधीश एन. एम. जामदार आणि एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने कोचर यांची याचिका सुनावणीसाठी योग्य नसल्याचा आयसीआयसीआय बँकेचा युक्तिवाद मान्य करीत कोचर यांना पदावरून काढून टाकण्याचा निर्णय बँकेचा खासगी असल्याचे स्पष्ट केले. आयसीआयसीआय बँकेच्या वतीने ऍड. दारियस खंबाटा यांनी न्यायालयात सांगितले की, संविधानातील कलम 226 नुसार अशा प्रकरणात न्यायालयाला आदेश किंवा रिट जारी करण्याचा अधिकार आहे. तसेच खंबाटा यांनी कोचर यांची याचिका रद्द करण्याची मागणीदेखील केली.
नोकरीवरून काढून टाकण्याच्या निर्णयाविरोधात कोचर यांनी 30 नोव्हेंबरला उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. कोचर यांच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादानुसार बँकेने कोचर यांचा राजीनामा 5 ऑक्टोबर 2018 रोजी स्वीकारला होता. त्यानंतर त्यांना नोकरीवरून काढून टाकणे हे चुकीचे असल्याचे न्यायालयाला सांगितले. अधिकाराचा गैरवापर करीत व्हिडीओकॉन समूहाला बेकायदेशीरपणे 3 हजार 250
कोटींचे कर्ज दिल्याचा आरोप कोचर यांच्यावर आहे.

























































