जगाची चिंता वाढतीच, कोरोनाग्रस्त 92 हजारांवर; चीनमध्ये आणखी 31 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चीनमधून हाहाकार उडवून दिलेल्या कोरोना विषाणूने जवळपास सर्वच जग व्यापले आहे. चीनमध्ये या विषाणूने गुरुवारी आणखी 31 जणांचा बळी घेतला. त्यामुळे येथील कोरोनाग्रस्तांची संख्या 80,400 हून अधिक झाली आहे. वुहान प्रांतातील परिस्थिती आणखी गंभीर बनली असून विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना राबवल्या जात आहेत अशी माहिती चीनचे राष्ट्रपती शी चिनपिंग यांनी दिली.

चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने गुरुवारी देशातील कोरोनाच्या फैलावाची आकडेवारी जाहीर केली. चीनमध्ये बुधवारी कोरोना विषाणूचे 139 नवीन रुग्ण आढळून आले तर 31 लोकांचा मृत्यू झाला आहे. हुबेई प्रांत आणि या प्रांताची राजधानी वुहान परिसरात सर्वाधिक बळींची नोंद झाली आहे. बळींची संख्या 3 हजारांवर गेली असल्याने चीनचे प्रशासन प्रचंड हादरून गेले आहे. याचा गंभीर फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसला आहे.

हाँगकाँगमध्ये कुत्र्यांनाही कोरोनाची लागण
जगभरातील कोरोना बळी आणि रुग्णांची संख्या वाढतीच असताना आता प्राण्यांनाही या विषाणूने दंश करण्यास सुरुवात केली आहे. हाँगकाँगमध्ये एका महिलेने पाळलेल्या कुत्र्याला कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. हाँगकाँगमधील कोरोनाग्रस्तांची संख्या 100वर गेली आहे.

जगभरातील जवळपास 30 कोटी विद्यार्थ्यांना फटका
कोरोना विषाणू फैलावाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील अनेक शाळा तात्पुरत्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जगभरातील जवळपास 30 कोटी शाळकरी मुलांना मागील काही आठवडय़ांपासून घरातच राहावे लागत आहे. त्यांच्या शैक्षणिक वेळापत्रकावर कोरोनाचा गंभीर परिणाम झाला आहे.

दक्षिण कोरियात कहर
कोरोनाने दक्षिण कोरियातही हाहाकार उडवला आहे. देशात जवळपास 6 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी आतापर्यंत 36 देशांतील नागरिकांना दक्षिण कोरियात प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

कोरोनाशी लढण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून 50 अब्ज डॉलर्सची मदत
कोरोनाने संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था कोलमडून टाकली आहे. जगावर ओढवलेल्या या भीषण संकटाचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने 50 अब्ज डॉलर्सची आर्थिक मदत पुरवली आहे. कोरोनाचा जगभरातील फैलाव अत्यंत गंभीर बाब आहे. परिस्थिती आणखी भीषण बनण्याची भीती आहे. याचा आपणा सर्वांनाच फटका बसणार आहे. त्यामुळे आपण ही आर्थिक मदत उपलब्ध करीत असल्याचे आयएमएफचे व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिएव्हा यांनी सांगितले.

यंदा विमान कंपन्यांचे 113 अब्ज डॉलर्स नुकसान
जगभर दहशत माजवलेल्या कोरोनाचा हवाई क्षेत्रालाही मोठा फटका बसणार आहे. या विषाणूच्या फैलावामुळे यंदा विमान कंपन्यांचे तब्बल 113 अब्ज डॉलर इतके नुकसान होणार आहे. जगभरातील प्रवासी महसुलात 19 टक्क्यांची घट होण्याची भीती’ इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन’ने व्यक्त केली आहे.