मुंबईच्या नऊ वर्षीय चिमुरड्याची करामत, दृष्टिदोष शोधणाऱ्या अनोख्या ऍपची निर्मिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानातील 8 ते 10 टक्के मुले ही डोळ्यातील वक्रीभवनाने त्रस्त असून यावर उपाय म्हणून त्यांनी कधीही चष्मा घातलेला नाही. या मुलांसाठी मुंबईतील 9 वर्षीय गर्वित सूदने ‘दृष्टी ऍप’ तयार केले आहे. या ऍपच्या माध्यमातून लोकांना डोळ्यांची तपासणी करता येते आणि त्याद्वारे डोळ्यांचे किंवा दृष्टिदोषाशी संबंधित आजारांचे निदान करता येते. त्यामुळे वेळीच उपचार शक्य होणार आहेत.

गर्वितच्या डोळ्यांचा अपाय हा उशिरा समोर आला आणि तो दृष्टिदोष असल्याचे निदान झाले. उपचार घेत असताना त्याला ‘व्हाईटहॅट ज्युनियर’ व्यासपीठावर जो अनुभव आला त्याचा फायदा इतरांसाठी करून द्यायचा होता. त्यासाठी त्याने ऍपची निर्मिती केली. ते वापरायला अगदी सोपे ऍप असून वाचकाला त्यांच्या मोबाईल स्क्रीनवरील विविध आकारातील काही आद्याक्षरे आणि आकडे वाचायचे असतात. ते कशाप्रकारे वाचतात, यावरून त्या व्यक्तीच्या नजरेतील परिणामकारकता शोधता येते, असे उद्गार ‘क्हाईटहॅट ज्युनियर’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी करण बजाज यांनी सांगितले.

गर्वित हा ‘व्हाईटहॅट ज्युनियर’ने घेतलेल्या सिलीकॉन व्हॅली उपक्रमामधील 12 विजेत्यांपैकी एक आहे. हिंदुस्थानातून आलेल्या तब्बल 7000 प्रवेशिकांचे परीक्षण केल्यानंतर त्याच्या ऍपची निवड झाली होती.