राज्याच्या विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केलेला अर्थसंकल्प हा महाराष्ट्रातील प्रत्येक समाजासाठी, प्रत्येक घटकासाठी, प्रशासनाच्या सर्व क्षेत्रांसाठीचा अर्थसंकल्प आहे. व्यावहारिक आणि महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणाऱया अर्थसंकल्पाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यमंत्री शंभूराजे देसाई व मंत्रिमंडळातील सर्व सहकारी, वित्त व नियोजन आणि इतर सर्व विभागांतील अधिकारी या सर्वांचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.

पर्यटनामुळे निर्माण होणारे रोजगार आणि महसूल लक्षात घेऊन पर्यटन विभागाला दिलेल्या निधीत ऐतिहासिक वाढ केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले. पर्यटन विभागासाठी निधीमध्ये एवढी वाढ यापूर्वी कधीच झाली नव्हती. यामुळे राज्याच्या पर्यटनाला मोठी चालना मिळेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागासाठी केलेली 1400 कोटी रुपयांची तरतूद, मुंबईकडे देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रतिवर्षी 100 कोटी रुपयांची तरतूद, हाजीअली परिसराचा विकास आराखडा तयार करण्याचा निर्णय, यासाठी 10 कोटींचा निधी, पाचगणी आणि महाबळेश्वरच्या विकासासाठी निधी, महाविद्यालयांमध्ये पर्यटन व हॉस्पिटॅलिटी अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानस, लोणार सरोवराच्या विकासासाठी निधी, प्रबोधनकार ठाकरे आणि विख्यात साहित्यिक राम शेवाळकर यांच्याशी संबंधित अचलपूर शहराच्या विकासासाठी आराखडा, मुरुड – जंजिरा समुद्रकिनाऱयाचे सुशोभीकरण, सज्जनगड ते परळी रोपवे, शिवनेरी किल्ला पर्यटन विकास, श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास अशा विविध क्षेत्रांच्या विकासाचा निर्धार आणि त्यासाठी भरीव तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

पर्यावरणासाठी 230 कोटी
ग्लोबल वॉर्मिग आणि क्लायमेट चेंज यासाठी उपाययोजना राबविण्यात येत असून पर्यावरण विभागामार्फत राबविण्यात येणाऱया योजनांसाठी 230 कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत.नदी प्रदूषण प्रतिबंधक उपाययोजनांसाठी निधी, विशेषतः नाग, इंद्रायणी, वालधुनी या नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी अडवणे, त्यावर प्रकिया करणे, त्यासाठी प्रक्रिया केंद्र स्थापन करणे याचा निश्चय करण्यात आला आहे. अशा निर्णयांमधून राज्यातील नद्यांचे प्रदूषण रोखण्यास मदत होईल, असे मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

वरळीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन संकुल
पर्यटनाच्या दृष्टीने मुंबई शहराचा विकास करण्यासाठी अर्थसंकल्पात भरघोस तरतूद करण्यात आली आहे. वरळी डेअरीच्या 14 एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन संकुलाची निर्मिती करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी जागतिक स्तरावरील पर्यटन सल्लागाराची नेमणूक करून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार आहे. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आकर्षक मत्स्यालयाचाही समावेश आहे. या प्रकल्पाला सुमारे एक हजार कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.

मुंबईतील पर्यटन विकासासाठी 500 कोटी
देशकिदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध पर्यटन विकासकामांसाठी येत्या पाच वर्षांसाठी 500 कोटी रुपये निधी दिला जाणार आहे. मुंबईतील हाजी अली परिसराचा विकास आराखडाही करण्यात येणार आहे. पर्यटन व्यवसायात कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी महाविद्यालयांमध्ये पर्यटन व हॉस्पिटॅलिटी पदविका आणि पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. लोणार सरोवर परिसराचा विकास होणार आहे.