
प्रदूषणमुक्त मुंबईसाठी पालिका लवकरच ई-बाईक आणि सायकल सुविधा सुरू करणार आहे. यामध्ये प्रवाशांना रेल्वे स्टेशन, मोठी कार्यालये, आस्थापने आणि गर्दीच्या ठिकाणी ‘पॉइंट टू पॉइंट’ सेवा मिळणार आहे. या सेवेसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये लवकरच मार्गांची निवड केली जाणार आहे. या पब्लिक बाईक शेअरिंग उपक्रमाला पालिका महासभेच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
मुंबईत वाहतूक व्यवस्था सुधारून प्रवासी-मुंबईकरांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मुंबईचा आगामी विकास लक्षात घेता पर्यावरण रक्षणासाठी सार्वजनिक दुचाकी सामायिकरण (पीबीएस) यंत्रणा राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खासगी कंत्राटदारांच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱया या उपक्रमात प्रवाशांना माफक दरात आपले घर ते स्टेशन किंवा निश्चित केलेल्या ठिकाणांवर उपलब्ध असलेली ई-बाईक किंवा पॅडलची सायकल घेऊन जाता येणार आहे. विशेष म्हणजे ही बाईक किंवा सायकल संबंधित स्टेशनवर पार्क करता येणार आहे. शिवाय ती परत करण्याची जबाबदारीही त्याच्यावर नसेल. ही सायकल स्वयंचलितरीत्या लॉक होणार आहे. शिवाय हवी तेव्हा उपलब्ध पार्किंगच्या ठिकाणाहून पुन्हा प्रवासासाठी घेता येईल.
अशी राबवणार यंत्रणा
खासगी कंत्राटदाराच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात येईल. यामध्ये उपक्रम चालवणारा किंवा जाहिरातदार वेगळा असू शकेल.
जाहिरातीच्या माध्यमातून येणारा महसूल एक्रो खात्यात ठेवला जाईल आणि त्याचा वापर दुचाकी ट्रक, बाईकसाठी साधनसुविधा, दुचाकी सामायिकरण किंवा पालिकेला योग्य वाटणाऱया उद्दिष्टांसाठी वापरता येईल.
मुंबईत पर्यावरणाचे रक्षण आणि सायकलिंगला प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार असल्यामुळे पहिल्या वर्षी मोफत पार्किंग असेल.
विमा संरक्षण, ऍप ट्रकिंग, एक लाख बाईक्स
पीबीएस उपक्रमात वापरले जाणारे वाहन इलेक्ट्रिक ऊर्जेवर चालणारे असावे, वाहनाचा कमाल वेग ताशी 25 किमीपेक्षा जास्त नसावा अशा अटी असतील, तर पॅडलयुक्त सायकल ही वजनाने हलकी, सुसज्ज ब्रेकसारख्या सुविधा, बंदिस्त साखळ्या आणि गियर्स असावेत अशा अटी असतील. दुचाकी स्थानकाची उपलब्धता मोबाईल ऍपच्या माध्यमातूनही समजणार असून उपक्रम चालकाकडून दुचाकीस्वारांना विमा संरक्षणही मिळेल. उपक्रमाच्या सुरुवातीला शहरात सुमारे एक लाख बाईक-सायकल उपलब्ध करण्याचे उद्दिष्टय़ असेल.





























































