
फेसबुकवर महिलेची बदनामी करणार्याला मालाड पोलिसांनी अटक केली. जुन्या वादाच्या रागातून त्याने बदनामी करण्यासाठी फेसबुकवर अश्लील फोटो टाकले होते. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
तक्रारदार या मालाड परिसरात राहतात. नोव्हेंबर महिन्यात तक्रारदार यांना अज्ञात नंबरवरून फोन येऊ लागले. त्यानंतर त्यांनी मालाड पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. वरिष्ठ निरीक्षक जॉर्ज फर्नांडिस यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विवेक तांबे आणि पोलीस हवालदार अशोक कोंडे यांनी तपास सुरू केला. पोलिसांनी कौशल्याचा वापर करून काही माहिती मिळवली. त्या माहितीनंतर पोलीस अटक आरोपीपर्यंत पोहचले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. तक्रारदारांच्या पतीचा अटक आरोपीचा जुना वाद होता. राग डोक्यात ठेवून त्याने महिलेची बदनामी करण्यासाठी तिचे अश्लील फोटो आणि नंबर सोशल फेसबुकवर अपलोड केला. त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले होते.



























































