इतका आक्रोश कशाला?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अभय मोकाशी

वास्तविक कोरोनापेक्षाही इतर अनेक रोग भयंकर आहेत. मात्र कोव्हिड-19 बद्दल जास्त आक्रोश होत आहे. विविध रोगांबद्दल शास्त्रज्ञांकडून आणि माध्यमांतून भीती पसरवली जाते असे दिसून येते. मॅड काऊ या रोगाने पाच लाख लोकांचा प्राण घेतला जाईल असे युरोपियन युनियनच्या शास्त्रज्ञांनी 1999 मध्ये भाकीत केले होते, पण असे काही झाले नाही.

कोरोना एक विषाणू आहे आणि कोव्हिड-19 हा त्या विषाणूने होणारा रोग आहे. कोव्हिड-19 हा चीनमधून सुरू झालेला रोग जगात अनेक देशांत पसरत आहे. कोरोना विषाणूमुळे होणारा कोव्हिड हा एकमेव रोग नाही. याआधी सार्स (सिव्हियर ऍक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम) हा कोरोना व्हायरस-1 या विषाणूमुळे झाला होता, तर मर्स (मिडलईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम) हा सीओव्ही या कोरोना व्हायरसने होतो. याचाच अर्थ आतापर्यंत तीन रोग कोरोना व्हायरसमुळे झाले आहेत हे दिसते. इतर विषाणूंप्रमाणे या विषाणूंमध्येदेखील उत्परिवर्तन होते, ज्यामुळे नवीन रोगांची निर्मिती होते. डिसेंबर 2019मध्ये कोरोना व्हायरसचे उत्परिवर्तन झाले आणि त्याला 2019 नोव्हेल कोरोना व्हायरस असे नाव देण्यात आले. हा विषाणू नवीन असल्यामुळे त्याला नोव्हेल असे म्हटले गेले आणि त्यामुळे झालेला रोग म्हणजे कोव्हिड-19 (कोरोना व्हायरस डिसीझ). कोरोना या विषाणूवर मुकुटासारखे टोक असते म्हणून त्याला कोरोना (मुकुट) असे म्हटले जाते.

वास्तविक कोरोनापेक्षाही इतर अनेक रोग भयंकर आहेत. मात्र कोव्हिड-19 बद्दल जास्त आक्रोश होत आहे. जागतिक आरोग्य संस्थेचे महासंचालक डॉ. टेड्रोस अधानोम घेब्रेयेसुस यांनी 9 मार्च रोजी पत्रकारांसमोर बोलताना या रोगावर मात करता येईल असा विश्वास दर्शविला. या रोगाची लागण 100 देशांत झाली असली तरी 93 टक्के रुग्ण चार देशांत आहे असे त्यांनी पत्रकारांच्या नजरेस आणले. कोव्हिड-19 वर मात करण्यासाठी विश्वास हा भीतीवरचा उतारा असावा, असे डॉ. घेब्रेयेसुस म्हणाले. हिंदुस्थानात मात्र भीती जास्त पसरविली जात आहे.

विविध रोगांबद्दल शास्त्रज्ञांकडून आणि माध्यमांतून भीती पसरवली जाते असे दिसून येते. मॅड काऊ या रोगाने पाच लाख लोकांचा प्राण घेतला जाईल असे युरोपियन युनियनच्या शास्त्रज्ञांनी 1999 मध्ये भाकीत केले होते, पण असे काही झाले नाही. सार्स नजरेस आल्यावर हा रोग लाखोंचे प्राण घेईल अशी 25 टक्के शक्यता असल्याचे एड्सवरील तज्ञ डॉ. पॅट्रिक डिकसन यांनी 2003 साली म्हटले होते.

पुन्हा 2009 साली जेव्हा स्वाइन फ्लू पसरू लागला तेव्हा बीबीसी या वृत्तवाहिनीने इंग्लंडचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लियम डोनाल्डसन यांच्या मते या रोगाने 65 हजार लोकांचा मृत्यू होईल अशी बातमी दिली होती. लगेच इंग्लंडने अंदाजे सहा कोटी पाऊंड खर्च करून औषधांचा साठा केला.
युरोपियन युनियनच्या संसदेच्या आरोग्य समितीने एका ठरावाद्वारे कौन्सिल ऑफ युरोपला जागतिक आरोग्य संस्थेवर स्वाइन फ्लूच्या बाबतीत औषधे बनविणाऱया कंपन्यांचा किती प्रभाव आहे याची चौकशी करण्यास संगितले. हा ठराव जर्मनीचे सदस्य डॉ. वॉल्फगॅंग वोडर्ग यांनी मांडला होता. ते स्वतः नामवंत फुप्फुसरोगतज्ञ आहेत. जागतिक आरोग्य संस्थेने औषध कंपन्यांच्या सांगण्यावरून 2009 साली स्वाइन फ्लू जागतिक पातळीवरचा रोग असल्याचे घोषित केले का हे शोधावे असे त्या ठरावात म्हटले होते. जागतिक आरोग्य संस्थेच्या अनेक तज्ञांचे मोठय़ा औषध कंपन्यांशी संबंध आहेत असे त्या ठरावात म्हटले होते.

चुकीच्या अंदाजामुळे जागतिक आरोग्य संस्थेने स्वाइन फ्लू रोखण्यासाठी लस आणि इतर औषधे विकत घेऊन 18 अब्ज अमेरिकी डॉलर निष्कारण खर्च केला असा दावा कौन्सिल ऑफ युरोपने आपल्या पाहणीनंतर केला. औषध कंपन्यांनी परिस्थितीचा फायदा घेऊन चाचणी केल्याशिवाय लस बाजारात आणली आणि ते जागतिक आरोग्य संस्थेला विकत घेण्यास भाग पाडले.

या रोगामुळे चीनच्या आर्थिक स्थितीवर मोठा परिणाम होणार आहे. त्यात जगभर या रोगाबद्दल निर्माण केलेल्या भीतीने चीनच्या व्यापारावर अधिक परिणाम होणार आहे आणि अशी भीती पसरविण्यामागे हेही एक कारण असू शकते.

राजकीय इच्छाशक्ती असेल तर काय करता येते हे कोव्हिड-19वर मात करताना चीनने दाखवून दिले आहे. चीनने 6,300 मजूर कामाला लावून दहा दिवसांत 2,600 खाटांचे एक मोठे रुग्णालय उभे केले, ज्यात फक्त कोव्हिड-19च्या रुग्णांवर उपचार केले जातील. तसेच सुमारे 18 दिवसांत अस्तित्वात असलेल्या 24 रुग्णालयांत 13 हजार अधिक खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे.

औषध कंपन्यांबरोबर शाकाहाराचा प्रचार करणारे अतिरेकीदेखील या परिस्थितीचा फायदा घेऊन हा रोग मांसाहार केल्याने होतो असा अपप्रचार करत आहेत. अशा प्रचारामुळे कुक्कुटपालन करणारे आणि त्यांचा माल विकणारे आर्थिक अडचणीत आले आहेत आणि याचा परिणाम आपल्या देशाच्या आर्थिक परिस्थितीवर होईल याकडे या अतिरेक्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे. असा खोटा प्रचार करण्याऐवजी जर जनतेला खोकताना आणि शिंकताना तोंड आणि नाक रुमालाने झाकावे हा संदेश जर वारंवार समाजमाध्यमांतून पाठविला तर ते फायदेशीर ठरेल.

सार्स, मर्स आणि कोव्हिड-19 हे तिन्ही रोग जर एकाच प्रकारच्या विषाणूने होत असेल तर कोव्हिड-19 बद्दल इतका आक्रोश का केला जात आहे असे प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. कोव्हिड-19पेक्षा सार्स जास्त घातक आहे. सार्स झालेल्या रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण 10 टक्के आहे, तर कोव्हिड-19मध्ये हे प्रमाण एक ते दोन टक्के आहे.
कोव्हिड-19 पेक्षा इबोला हा रोग कमी सांसर्गिक आहे, तरीदेखील या रोगाची लागण 2014 ते 2016 या दोन वर्षांत पश्चिम आफ्रिकेतील 28,600 लोकांना झाली आणि त्यापैकी 11,325 जणांचा मृत्यू झाला.
एड्समुळे 1981 सालापासून जगभरात तीन कोटी 60 लाख जणांचा मृत्यू झाले, तर आपल्या देशात नेहमी होणाऱया इन्फ्लुएंझाने (फ्लू) 1918पासून जगभरात दोन ते पाच कोटींचे प्राण घेतले आहेत.
सार्सचा उगम 2003 साली झाला होता आणि एका वर्षात त्यावर नियंत्रण आणले गेले. तरीदेखील सार्सचे 8,098 रुग्ण आढळले आणि त्यापैकी 774 जणांचा मृत्यू झाला. म्हणजे मृत्यूचे प्रमाण सरासरी 10 टक्के होते.
सेंटर्स फॉर डिसीझ कंट्रोल अँड प्रीव्हेंशन या संस्थेनुसार 2009 ते 2010 या वर्षात अमेरिकेत एच1एन1मुळे 12,469 लोकांचा मृत्यू झाला तर चालू मोसमात मोसमी फ्लूने अमेरिकेत 18 हजार लोकांचे प्राण घेतले आहेत.
जगभरात 2018 साली क्षयरोगाने 15 लाख लोकांचा मृत्यू झाला आणि जागतिक पातळीवर सर्वाधिक प्राण घेणाऱया दहा रोगांमध्ये क्षयरोग आहे.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)