
सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 ची अंमलबजावणी जाहीर केल्याने 14 मार्च ते 31 मार्च अखेर जिल्ह्यामध्ये होणाऱ्या जत्रा, यात्रा, उरुस, सभा, मेळावे, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा आदी सार्वजनिक अन गर्दीच्या कार्यक्रमावर बंदी घातली आहे.
दरम्यान, येत्या 4 एप्रिलला चैत्री वारीचा सोहळा आहे. ऐन वारीच्या तोंडावर बंदीची घोषणा झाल्याने वारीच्या सोहळ्यात कोरोनाचे विघ्न येण्याची शक्यता बळावली आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शनिवारी या विषयाच्या अनुषंगाने आदेश जारी केला असून याची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. जे आदेशाची अंमलबजावणी करणार नाहीत त्यांच्यावर पोलीस कारवाई करण्याचे संकेत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
आदेशात म्हटले आहे की, सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग व प्रादुर्भाव वाढू नये यासाठी दक्षता म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी केली जात आहे. कोरोना हा विषाणू संसर्गजन्य आहे लोकांच्या सहवासातून तो जास्त लवकर पसरतो हे लक्षात घेऊन लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून दिनांक 14 मार्च ते 31 मार्च 2020 अखेर जिल्ह्यामध्ये होणाऱ्या यात्रा, जत्रा, उरुस, धार्मिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा आदी सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली असल्याचे जाहीर केले आहे.
दरम्यान, येत्या 4 एप्रिलला पंढरपूरची चैत्री वारी आहे या वारीला तीन ते चार लाख भाविकांची उपस्थिती असते या सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक मधून दिंड्या आणि पालख्या चालत निघतात. एक ते दोन आठवड्याचा पायी प्रवास करुन दिंड्या पंढरीत येत असतात. 14 मार्च पासून बंदी आदेश लागू झाल्यामुळे आणि तो पुढे किती दिवसापर्यत ठेवला जाईल हे निश्चित नसल्याने, चैत्र वारी बाबत वारकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने चैत्री वारी बाबत वेळीच भूमिका घेणे आवश्यक आहे. पैठण येथील यात्रेबाबत असाच अचानक निर्णय जाहीर झाल्याने वारकऱ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागला होता हा अनुभव पाहता प्रशासनाने वेळीच निर्णय जाहीर करणे गरजेचे आहे.



























































