निवृत्त सदस्य नव्या जोमाने सभागृहात येतील – मुख्यमंत्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
uddhav thackeray

विधान परिषदेतून निवृत्त होत असलेल्या सदस्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात, समाजात जसा कर्तृत्वाचा ठसा उमटवलाय तसाच ठसा त्यांनी सभागृहात उमटवला. त्यांनी अत्यंत तळमळीने सभागृहात प्रश्न मांडले. वादविवाद केले. जे पटतंय ते स्वीकारून, नाही पटत ते सोडण्याची लोकशाहीची परंपरा सभागृहात पाळली. या सदस्यांच्या अभ्यासाचा, विचारांचा सरकारला उपयोग झाला. त्यांची सभागृहातील उपस्थिती महाराष्ट्राला हवी आहे. त्यामुळे ते पुन्हा तीच जिद्द, तेच विचार घेऊन ताजेतवाने होऊन सभागृहात येतील, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवृत्त सदस्यांना शुभेच्छा दिल्या.

विधान परिषदेतून निवृत्त होणाऱया 18 सदस्यांना निरोप देण्याचा प्रस्ताव आज मांडण्यात आला. त्यावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, हा निरोप समारंभ नसून कृतज्ञता समारंभ आहे. आजच्या दिवसाची तुलना मी शाळेच्या शेवटच्या दिवसाशी करेन. शाळेतला पहिला दिवस कधी उगवतो, शेवटचा दिवस मावळतो कधी कळत नाही. शाळेचा शेवटचा दिवस येतो तेव्हा गेल्या 10 वर्षांत आपण कसे वागलो, किती मस्ती केली, शिक्षकांनी आपल्याला किती शिक्षा केली या गोष्टी आठवत राहतात. त्या आयुष्यभर लक्षात राहतात. हे वरिष्ठ सभागृह विविध क्षेत्रांत काम करणारे कार्यकर्ते, साहित्यिक, विचारवंत आदींचे आहे. येथील सदस्यांचे बोलणे प्रबोधनपर असते. त्यांच्या विचारांचा फायदा सभागृहाला, पर्यायाने सरकारला झाला आहे.

अत्याचाराच्या ठिकाणी धडाडीने पोचणाऱया कार्यकर्त्या
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱहे यांना निरोप देतोय हे खरे वाटत नाही. विधान परिषदेवर निवड झाल्यावर पहिल्यांदा पेढे, हारतुरे घेऊन आले तो दिवस काल परवाचा आहे असं वाटतंय. हा दिवस सगळय़ांच्या आयुष्यात आला असेल. तुम्हा सर्वांच्या सत्काराची फुले कोमेजली नाहीत; कारण तुम्ही आपल्या कामाने ती ताजी ठेवली आहेत. तुमच्या कामकाजाचा दरवळ सदैव सभागृहात राहील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

हे सदस्य निवृत्त
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य हेमंत टकले, प्रकाश गजभिये, विद्या चव्हाण, किरण पावसकर, आनंद ठाकूर, ख्वाजा बेग, जगन्नाथ शिंदे, काँग्रेसचे जनार्दन चांदूरकर, हरिसिंग राठोड, अनंत गाडगीळ, आनंदराव पाटील, रामहरी रुपनवर, हुस्नबानू खलिफे, भाजपच्या स्मिता वाघ, पृथ्वीराज देशमुख, अरुण अडसड, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जोगेंद्र कवाडे निवृत्त होणार आहेत.