
कैद्यांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून तुरुंग प्रशासनाने पावले उचलली आहेत. आर्थर रोड तुरुंगात कोरोनाच्या रुग्णांसाठी विशेष नेचरोपॅथी केंद्र लवकरच खुले केले जाणार आहे. तर राज्यातील 9 मध्यवर्ती तुरुंगांत विशेष वॉर्ड तयार करण्यात येणार आहेत.
राज्यात दिवसेंदिवस कोरोनाने बाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. कैद्यांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून तुरुंग प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. नुकतीच राज्यातील तुरुंग अधिकाऱयांनी आढावा बैठक घेतली. त्या बैठकीत अधिकाऱयांना कोरोनाबाबत काळजी घेण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. तुरुंगात नव्याने येणाऱया कैद्यांना आणि कर्मचाऱयांना गेट बाहेर सॅनिटायझरची सुविधा उपब्लध करून दिली आहे. तसेच सर्वच नवीन कैद्यांची तपासणी केली जाणार आहे. कैद्यांना ताप आला आहे का हे तपासले जाणार आहे.
तुरुंगात प्रवेश करण्यापूर्वी सर्वांनीच हात धुऊनच आत प्रवेश करावा अशा सूचना दिल्या आहेत. पुढील काळात जर कोरोनाचे रुग्ण वाढले तर राज्यातील 9 मध्यवर्ती तुरुंगांत विशेष वॉर्ड तयार केला जाणार आहे. तसेच तुरुंगातील एखाद्या कर्मचाऱयाला जर कोरोनाची लागण झाली तर त्याला राहण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
3 दिवसांत एक लाख मास्क तयार
ठाणे, कल्याण, नागपूर, अकोला, अमरावती, कोल्हापूर, पुणे, संभाजीनगर आणि नाशिक येथे गेल्या तीन दिवसांत आतापर्यंत 1 लाख मास्क तयार करण्यात आले आहेत. हे मास्क कैदी आणि तुरुंगातील कर्मचारी यांच्याकरिता असणार आहेत. जर सरकारी विभागाने मास्कची मागणी केल्यास त्यांना मास्क उपलब्ध करून देऊ असे विशेष पोलीस महानिरीक्षक दीपक पांडेय यांनी सांगितले.
आर्थर रोड तुरुंगातील नेचरोपॅथी केंद्र होणार खुले
तुरुंगात कोरोनाचे संशियत रुग्ण आढळल्यास त्याच्यावर उपचार करण्यासाठी आर्थर रोड तुरुंगात विशेष नॅचरोपॅथी केंद्र लवकरच सुरू केले जाणार आहे. केंद्र सुरू करण्याबाबत परवानगी मिळाली असल्याचे दक्षिण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दीपक पांडेय यांनी सांगितले. नॅचरोपॅथी सेंटरकरिता तुरुंग प्रशासनाने आयुष मंत्रालयाशी करार केला आहे.





























































