संभाजीनगर – कोरोना संसर्ग रोखण्यासाठी वसतिगृहांना सुट्या, विद्यार्थी घरी परतले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने शाळा महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे संभाजीनगर शहरातील समाज कल्याण विभाग आदिवासी विकास विभाग यांसह विविध खासगी वसतिगृहे तसेच शैक्षणिक मंडळाचे वसतिगृह बंद करण्यात आले आहे. त्यामुळे मंगळवार सकाळपासूनच विद्यार्थ्यांची गावी जाण्याची लगबग सुरू आहे.

जगभरात कोरोना संसर्गाने हैदोस घातला आहे. हिंदुस्थानात कोरोना संसर्गाचा फैलाव होत असून त्यावर उपाययोजना करण्यासाठी राज्य व केंद्र सरकार सरसावले आहे. महाराष्ट्रात पुण्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातील हा आकडा जवळपास 39 वर पोहोचला आहे. त्यामुळे तातडीच्या उपाययोजना म्हणून राज्य सरकारने शाळा महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच विद्यापीठाने होऊ घातलेल्या परीक्षा 31 मार्च पर्यंत पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे शाळा महाविद्यालयांनंतर कोरोना संसर्ग रोखण्यासाठी वसतिगृह बंद करण्यात येत आहेत.

शहरातील नामवंत विद्यालयाप्रमाणेच समाजकल्याण विभागातर्फे चालविल्या जाणारे जवळपास सहा मुला मुलींचे वसतिगृह तसेच आदिवासी विकास विभागातर्फे चालविल्या जाणारे आदिवासी मुला मुलींचे वसतिगृह अभियांत्रिकी कृषी यासह शैक्षणिक पदवी अभ्यासक्रमातील सर्व खासगी शासकीय वसतिगृह मंगळवारपासून खाली करण्यात येत आहे.