
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होणारे कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. त्यानुसार सिंधुदुर्ग जिह्यात दशावतारी नाटय़ मंडळामार्फत सादर करण्यात येणारे नाटय़प्रयोगही रद्द करण्याच्या सूचना प्रशासनाने आयोजकांना दिल्या आहेत. त्यामुळे रोजीरोटीसाठी काम करणाऱया या नाटय़ मंडळातील कलाकारांवर एक संकट उभे राहिले आहे.
देशात सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी गर्दी होईल असे सर्व शासकीय कार्यक्रम शासनाने रद्द केले आहेत. त्यानंतर खबरदारी म्हणून सर्व सार्वजनिक कार्यक्रमांवरही बंदी घालण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिह्यात सार्वजनिक आणि धार्मिक कार्यक्रम मोठय़ा प्रमाणात साजरे केले जातात आणि त्या ठिकाणी दशावतारी नाटय़प्रयोग हा होतच असतो. त्याला जिह्यातील नाटय़रसिक चांगला प्रतिसाद देतात. त्यामुळे जनतेच्या आरोग्याची काळजी म्हणून आणि एक खबरदारी म्हणून गर्दी होणारे कार्यक्रम आयोजकांनी रद्द करावेत किंवा स्थगित करावेत असे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. विविध कार्यक्रमांमध्ये सादर होणारे दशावतारी नाटय़प्रयोग आयोजकांनी रद्द करण्यास सुरुवात केली आहे. नाटय़प्रयोग रद्द होत असल्याने कलाकरांना त्यातून मिळणारा मोबदला मिळेनासा झाला आहे. या सर्व प्रकारामुळे अत्यल्प मानधनावर रोजीरोटीसाठी काम करणाऱया कलाकारांवर आर्थिक संकट कोसळले आहे. नाटय़प्रयोग झाला तरच चूल पेटणार अशी या कलाकारांची स्थिती असल्याने नाटय़प्रयोग रद्द होत असल्याने त्यांच्यासमोर एक संकट निर्माण झाले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दशावतारी नाटय़प्रयोग रद्द झाल्याने या कलाकारांवर एक संकट निर्माण झाले आहे. यात त्यांचे आर्थिक नुकसान होत असून या कलाकारांनाही शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.































































