
दुधाच्या पिशव्या, वर्तमानपत्रे या वस्तूंच्या माध्यमातून कोरोनाचा विषाणू पसरण्याची शक्यता नाही. त्यामुळे सोशल मीडियातील अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन तज्ञांनी केले आहे.
कोरोना आजाराबाबत सोशल मीडियावर चुकीची, कोणतीही शास्त्रीय आधार नसलेली माहिती शेअर करण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. वृत्तपत्रे, दुधाच्या पिशव्या आदी वस्तूंच्या माध्यमातून हा विषाणू पसरतो, अशी अफवा यामुळेच पसरली आहे. त्यातून काही गृहसंकुलांनी दूधविक्रेते आणि वृत्तपत्र विक्रेत्यांना आत येण्यास मनाई करण्याचे प्रकार घडत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. कोरोनाचा संसर्ग केवळ बाधित व्यक्तींच्या संपर्कातून होतो. मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर, वर्तमानपत्रे यामुळे कोरोनाचा संसर्ग होत नाही, असे टोपे यांनी स्पष्ट केले. कोरोनाच्या जनजागृतीसाठी वृत्तपत्रे वाचणे चांगले आहे, असेही त्यांनी सांगितले.
कोरोना संसर्ग हवेतून पसरत नाही. तसेच इतर वस्तूंवर हा विषाणू फार काळ टिकत नाहीत. त्यामुळे वृत्तपत्रांच्या माध्यमातून कोरोनाच्या विषाणूचा प्रसार होणे शक्य नाही, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
तज्ञ सांगतात, कोरोनाचा विषाणू वस्तूंच्या पृष्ठभागांवर काही तास टिकत असला तरी या कालावधीबाबत अजून शास्त्रीय माहिती उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये.
वृत्तपत्रांमुळे हा संसर्ग पसरण्याची शक्यता नसल्याने लोकांनी वृत्तपत्रे नेहमीप्रमाणे वाचावीत, असे आवाहन वृत्तपत्र विक्रेत्यांनी केले आहे.




























































