Corona Virus रत्नागिरी जिल्ह्यातील MIDC मधले कारखाने बंद करण्याच्या सूचना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी जिल्ह्यात एक कोरोना बाधित रूग्ण सापडला आहे. या रुग्णाला जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इथल्या डॉक्टरांच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. रत्नागिरीतील बाजारपेठेतील दुकाने बंद ठेवण्यात आली असून एमआयडीसीत सुरु असलेले कारखाने बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत आणि कोकण विभागाचे आयुक्त शिवाजीराव दौंड यांच्या उपस्थितीत एक आढावा बैठक झालीं. या बैठकीला जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, आमदार राजन साळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी के.एच.बघाटे आणि इतर अधिकारी उपस्थित होते. या  बैठकीनंतर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले की,कोरोनाला रोखण्यासाठी सर्वांनी मिळून लढा दिला पाहिजे. आजच्या बैठकीत आमदार राजन साळवी यांनी सुचविल्याप्रमाणे व्हेंटीलेटर उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. दहावी-बारावीच्या परीक्षेच्या वेळी मास्क लावयला मुभा देण्यात आली आहे मात्र त्या मास्क मध्ये कॉपी लपवली नाही याची पर्यवेक्षकांनी करावी, तसेच शाळांच्या बाहेर तसेच रेल्वे स्थानक आणि जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या बाहेर सॅनिटायझर उपल्बध करून देण्याच्या सूचना करण्यात आल्या असल्याचे सामंत यांनी सांगितले.

ज्या बंदरावर वाहतूक सुरु आहे ती बंद करावी तसेच ज्यांच्यावर शिक्के मारले आहेत आणि जे होम क्वारंटाईन न होता बाहेर फिरत आहेत त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी अशा सूचनाही सामंत यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यात येणाऱ्या चेकपोस्टवर तपासणी सुरु असून आतापर्यंत पाच हजाराहून अधिक जणांची तपासणी करण्यात आली आहे अशी माहिती देण्यात आली आहे.

कोकण आयुक्त शिवाजीराव दौंड यांनी आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना खरमरीत भाषेत सुनावले.ते म्हणाले की,आज मुंबईचे जिल्हाधिकारी २४ तास विमानतळावर राहून काम करत आहेत अशावेळी आपणही जिल्ह्यात सतर्क रहा. व्हेंटिलेटर यापूर्वीच उपलब्ध करायला हवे होते असे त्यांनी स्पष्टपणे सांगताना जे लोक सहकार्य करणार नाहीत त्यांच्यावर कायद्याप्रमाणे कारवाई करा असे त्यांनी पोलिसांना सांगितले. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्ह्यात दुबईसह आखाती देशातून येणाऱ्यांची संख्या अधिक असल्याची माहिती देताना त्यामुळे आपण अधिक सतर्क रहाणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.