संभाजीनगरमधील ‘त्या’ प्राध्यापिकेचा कोरोना अहवाल निगेटिव्ह, शहर कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यापासून दूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो- प्रातिनिधीक

संभाजीनगर शहरातील कोरोनाची लागण झालेल्या प्राध्यापिकेचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच त्यांच्या संपर्कातील 21 विद्यार्थ्यांचे व अन्य एका जणाचा अहवालदेखील निगेटिव्हच असल्याचे आढळून आले आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांनी ही माहिती दिली. यामुळे संभाजीनगर शहर कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात जाण्यापासून वाचले आहे.

महिला प्राध्यापिका काही दिवसांपुर्वी रशियात गेल्या होत्या. तेथे त्यांना कोरोनाची लागण झाली. तेथून त्या दिल्ली मार्गे शहरात आल्या. येथे त्यांनी 5 दिवस विद्यार्थ्यांना शिकवलेही होते. नंतर तपासणीत त्यांना कोरोनाची लागण झाले तेव्हा त्यांच्या सानिध्यात आलेले अनेकजण गांगरून गेले होते.

परंतु, कोरोनाची ही पहिलीच केस असल्यामुळे आरोग्य यंत्रणेने अतिशय तातडीने हालचाली केल्या. या महिला प्राध्यापिकेला रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर कोरोन्टाईन करून उपचार सुरू झाले. नंतर महापालिका, शासनाचा आरोग्य विभाग यांनी या प्राध्यापिकेच्या संपर्कात आलेल्या घरातील, संस्थेतील आणि शिकवले त्या वर्गातील सर्वांचीच तपासणी केली. त्यांच्या घरातील आणि संस्थेतील सर्व अवहाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.

शहरातील अन्य एकाचा अहवालही निगेटिव्ह आला आहे. कोरोनाची लागण झालेली महिला आणि संशयित अशा सर्वांचे अहवाल निगेटिव्ह येणे शहरवासीयांसाठी मोठा दिलासा देणारे आहे. यामुळे शहर कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्याच्या दूर असल्याचे वैद्यकीय तज्ञांनी सांगितले. परिणामी शहरातील आरोग्य यंत्रणेने सुटकेचा श्वास घेतला आहे.