कश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत सर्व व्यवहार बंद; कोरोनाची दहशत, देश लॉकडाऊन!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार, 22 मार्च रोजी देशभरात जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत जनतेने शनिवारपासूनच देश लॉकडाऊन केला. या लॉकडाऊनमुळे काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले असून बाजारपेठांमध्ये शुकशुकाट आहे. दरम्यान, देशात कोरोना संक्रमणाचा वेग वाढला असून, शनिवार सायंकाळपर्यंत बाधित रुग्णांची संख्या 300 वर गेली. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी केंद्र तसेच राज्य सरकारांनी जमावबंदी करण्याबरोबरच इतर कठोर निर्बंध लादले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेऊन आता सर्दी, पडसे, खोकला तसेच ताप असणाऱयांचीही कोरोना तपासणी करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

साडेतीन हजार गाडय़ा रद्द
कोरोना व्हायरसला आळा बसावा यासाठी रेल्वे प्रशासनाने आपल्या 3700 रेल्वे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी मध्यरात्री 12 वाजेपासून ते रविवार रात्री 10 वाजेपर्यंत देशभरातील रेल्वेंची धडधड थांबणार आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि सिकंदराबाद आदी उपनगरीय क्षेत्रात लोकल व स्थानिक गाडय़ांमध्ये कपात केली जाणार आहे. अतिमहत्त्वाच्या गाडय़ा मात्र यातून वगळण्यात आल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून अगोदरच दोनशेपेक्षा जास्त लांब पल्ल्याच्या गाडय़ा रद्द केल्या आहेत.

गो एअर, इंडिगोची उड्डाणे रद्द
रविवारी होणाऱया जनता कर्फ्यूमुळे गो एअर व इंडिगो या विमान कंपन्यांनीही आपली उड्डाणे रद्द केली आहेत. अनेक वर्षांनंतर रविवारी सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत आकाशात विमाने उडताना दिसणार नाहीत.

भोपाळ, जबलपूर बंद
कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये आढळल्याने खळबळ उडाली आहे. यापूर्वी जबलपूरमध्ये चौघे संशयित आढळले होते. जबलपूरमधील चौघांपैकी 1 जण जर्मनी तर तिघे दुबईमधून आल्याची माहिती आहे. या दोन्ही शहरातील बाजारपेठ बंद करण्यात आली असून मॉल, हॉटेल्सही पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. रेल्वे, बससेवाही खंडित करण्यात आल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

दिल्लीत संक्रमण वाढले, एका दिवसात 6 नवे रुग्ण
राजधानी दिल्लीत 24 तासांत कोरोनाचे 6 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता ही संख्या 26 झाली आहे. थेट राष्ट्रपती भवनापर्यंत कोरोना व्हायरस गेल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. दिल्लीतही मोलमजुरी करणाऱया नागरिकांना आर्थिक मदतीचे वाटप करण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे. दिल्ली, नोएडा, गुरुग्राममधील कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले आहेत. दिल्लीतील मॉल, बाजारपेठ, स्ट्रीट बाजार यापूर्वीच बंद करण्यात आले आहेत. आज नोएडात पाच तर गुरुग्राममध्ये सहा रुग्ण आढळले.

कश्मीरमध्ये जमावबंदी
लडाखमधील वस्ती अतिशय विरळ आहे. असे असतानाही लडाखमध्ये कोरोना व्हायरसचे 13 पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याने काळजी व्यक्त होत आहे. जम्मू व कश्मीरमध्ये कोरोनाचे 4 रुग्ण समोर आले असून, 2337 जणांना निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. कश्मिरात काही भागात कलम 144 अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली असून अनंतनाग, बडगाम, किश्तवाड, कुपवाडा आदी ठिकाणीही नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे.

राष्ट्रपतींचे दैनंदिन कार्यक्रम स्थगित
गायिका कनिका कपूर उपस्थित असलेल्या पार्टीला हजर असलेले खासदार भेटल्यामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील कोरोना तपासणी करून घेतली. राष्ट्रपतींच्या तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे सांगण्यात आले. मात्र तरीही खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रपतींनी आपले दैनंदिन कार्यक्रमही स्थगित केले असल्याचे सांगण्यात आले.

उत्तर प्रदेशात 31 मार्चपर्यंत कामे थांबवली
उत्तर प्रदेशात आतापर्यंत 24 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहे. आग्रा 8, लखनौ 8, नोएडा 4 याप्रकारे सर्व राज्यात एकूण 24 रुग्ण आढळले आहेत. यामुळे सर्व राज्यात 31 मार्चपर्यंत महत्त्वाच्या कामाव्यतिरिक्त सर्व कामे थांबवली आहेत.

सोनू निगम दुबईतच
गायक सोनू निगम सध्या सहकुटुंब दुबईतच आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोनू निगमने आणखी काही काळ तेथेच मुक्काम करण्याचे ठरवले आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी सोनू व त्याच्या कुटुंबाने स्वतःला आयसोलेट करून घेतले आहे.