
कोरोना व्हायरसमुळे हिंदुस्थानातील आयपीएल ही टी-20 लीगही 15 एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली. कोरोना व्हायरसचा संसर्ग हा वाढतच चालला आहे. त्यामुळे आता ही स्पर्धा 15 एप्रिलनंतरही होईल की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर बीसीसीआय व संघमालक यांच्यामध्ये येत्या 24 मार्च रोजी अर्थातच मंगळवारी कॉन्फरन्स कॉलद्वारे बैठक होणार आहे. त्यामध्ये आयपीएलच्या भवितव्याचा फैसला केला जाईल अशी शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात आली आहे.
या तारखांना सुरू करण्याचा प्रयत्न पण…
बीसीसीआय व आयपीएल संघ मालकांकडून काही तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्या दिवसापासून आयपीएलला सुरुवात करण्याचा प्रयत्न असणार आहे. यामध्ये 15 एप्रिल, 21 एप्रिल, 25 एप्रिल, 1 मे व 5 मे या तारखांचा समावेश आहे, पण कोरोना व्हायरसमुळे सध्या तरी आयपीएलला मुहूर्त सापडेल अशी चिन्हे दिसत नाहीत.
या पर्यायांवर होणार चर्चा
z प्रेक्षकांविना स्पर्धा खेळवावी.
z एका दिवशी दोन सामने खेळवायचे. विकेंड आणि विकडेज या दोन्हीला या लढती खेळवायच्या.
z दोन गटांत आठ संघांची विभागणी करायची. प्रत्येकी एका गटात चार संघांचा समावेश करून दोन्ही गटांतील सर्वोत्तम दोन संघ प्ले ऑफमध्ये आगेकूच करतील.
z दोन ते तीन ठिकाणीच सर्व लढती खेळवायच्या. जेणेकरून जास्त गर्दी होणार नाही.
z दिवसाला तीन लढती खेळवून स्पर्धेतील संपूर्ण लढती होतील याकडे लक्ष द्यायचे.
परदेशी खेळाडूंच्या उपस्थितीबद्दलही शंका
केंद्र सरकारच्या नियमानुसार हिंदुस्थानात पाय ठेवल्यानंतर परदेशी खेळाडूंना 15 दिवस एकांतवासात रहावे लागणार आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसचा प्रभाव ओसरल्यानंतरही परदेशी खेळाडूंना प्रत्यक्षात किती दिवस यामध्ये सहभागी होता येईल यावरही प्रश्नचिन्हच आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोरोना व्हायरस जरी आटोक्यात आला तरी त्याचा धसका सर्वांनीच घेतला आहे. त्यामुळे परदेशी खेळाडू या स्पर्धेत खेळण्यासाठी उत्सुक आहेत का, हाही एक प्रश्नच.

























































