आष्टीत जनता कर्फ्यु उत्स्फूर्त प्रतिसाद, वसाहतीत ही शुकशुकाट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संपूर्ण हिंदुस्थानात करोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये या साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुकारलेल्या जनता कर्फ्यु ला आष्टीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी सात वाजल्यापासून व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती, सकाळीच गाजबजनारा मेन रोड, मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट झाला होता.

रविवार हा आष्टीचा आठवडी बाजार असल्याने नागरिकांनी गजबजनाऱ्या आठवडी बाजारात पहिल्यांदाच शुकशुकाट दिसून आला. कोणीही नागरिक घराबाहेर दिसत नव्हते. शहरातील वसाहती मध्ये ही शुकशुकाट झाला होता, शाळेच्या सुट्टीदिवशी वसाहतीतिल लहान मुलांचा किलबिलाट शांत झाला होता. सर्व बच्चे कंपनी घरामध्येच कोणी अभ्यासात तर कोणी कॅरम, सापसीडी, चेस खेळत जनता कर्फ्यु ला प्रतिसाद देत होती, शहरातील खडकत मार्ग आणि नगर-बीड राज्यमार्गावर पहाटे पाच वाजल्यापासून दररोज मॉर्निंग ओक साठी जाणाऱ्या नागरिकांनी सुट्टी घेतल्याने गजबजलेला रस्ता ओस पडला होता.

‘जनता कर्फ्यु’च्या पार्श्‍वभुमीवर शहरातील सर्वच रस्त्यांवर शांतता पाहण्यास मिळाली. शहरातून किंवा शहरात येणाऱ्या वाहनांची चाके देखील थांबलेली होती. आष्टी पोलीस प्रशासनाकडून जनता कर्फ्यू पाडण्याचे आवाहन केले जात होते. जनतेने ही संसर्गाची साखळी तोडण्यासाठी एकी दाखवत घरातच थांबणे पसंत केले.

जनता कर्फ्यू असल्याने पहाटेपासूनच कोणी बाहेर निघत नसल्याचे पाहण्यास मिळाले. शहरातील प्रमुख चौकांमध्ये देखील कर्फ्यू असल्याचे स्पष्ट पाहण्यास मिळाले. तर शहरातून गेलेल्या महामार्गावर देखील सकाळी गाड्यांचा येणारा आवाज ऐकू आला नाही. महामार्गावर वाहतूक देखील पुर्णपणे बंद झालेली होती. खुप वेळानंतर एखादे वाहन जाताना दिसत होते.