10 परदेशी नागरिकांना ठेवले धार्मिकस्थळी; नेवाशात दोघांविरुद्ध गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नेवासा येथे एका धार्मिक स्थळी परदेशातील दहा जणांना एकत्र करून जमावबंदीच्या आदेशाचे पालन न केल्याने दोन जणांविरुद्ध नेवासा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परदेशातील 10 जणांना नगर येथे शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे हे 10 जण दिल्लीतील एका मोठ्या धार्मिक कार्यक्रमामधून आले होते. नगर , जामखेड, संगमनेर, नेवासा येथे त्यांनी धर्मप्रसाराचे काम देखील केले. यामुळे कोरोना प्रसाराचा मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे, पोलीस उपनिरीक्षक बी.एस. दाते, व्हि. यु. गायकवाड, टी. बी. गिते, ए. एस. कुदळे, एम. एल. मुस्तफा, एस. बी. गुंजाळ हे सर्व जण सरकारी पोलीस वाहनातून कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी नेवासा शहरात फिरत असताना शहरातील धार्मिक स्थळाचे ट्रस्टी जुम्माखान नवाबखान पठाण व सलिम बाबुलाल पठाण हे (दोघे राहणार नेवासा खुर्द) यांना जमावबंदीचा आदेश माहीत असतानाही त्यांनी सदर धार्मिक स्थळात बाहेर देशातील 10 व्यक्तींना प्रवेश दिला, तसेच सर्व 10 व्यक्ती तेथे राहत असल्याचे समजले.

जिबुती देशातील 5, बेनिन देशातील 1, डेकॉर्ट देशातील 3, घाना देशातील 1 असे एकूण दहा जण सार्वजनिक प्रार्थनास्थळी एकत्र आले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून पोलिसांनी जुम्माखान पठाण व सलीम पठाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सदरची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल प्रतापसिंह भगवान दहिफळे यांनी दिली.