कोरोनामुळे मानसिक आरोग्य धोक्यात, मनोरुग्णांच्या संख्येत वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना व्हायरसमुळे देशातील नागरिकांचे मानसिक आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या काही दिवसांत मनोरुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. इंडियन सायकॅट्रिस्ट सोसायटीने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार 20 टक्क्यांनी मनोरुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. कोरोना व्हायरसचा जसा प्रादुर्भाव झाला आहे तसे लोकांच्या वागण्यात बदल झाले आहेत. या आजारामुळे जागतिक अर्थव्यवस्थेलाही फटका बसला आहे. तसेच लोकांच्या मानसिक आरोग्यावरही त्याचा प्रभाव होत आहे.

आज तकच्या वेबसाईटने याबाबत वृत्त दिले आहे. इंडियन सायकॅट्रिस्ट सोसायटीने घेतलेल्या एका सर्वेक्षणानुसार काही आठवड्यांतच मनोरुग्णांच्या संख्येत 15-20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्याने लोकांच्या मनात मोठ्या प्रमाणात नकारात्मक विचार पसरले आहेत. लोक तणावाखाली जगत असल्याचे समोर आले आहे. लॉकडाऊन नंतर लोक घरीच राहिल्याने परिस्थिती अजून बिघडली आहे. काम नाही तसेच मूलभूत सुविधा नसल्यानेही त्याचा परिणाम लोकांवर होत आहे.

जानेवारी महिन्यात इंडियन काऊन्सिल फॉर मेडिकल रिसर्चने जारी केलेल्या आकड्यानुसार प्रत्येक ५ हिंदुस्थानींच्या मागे एका व्यक्तीला मानसिक आजार आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार लॉकडाऊनमुळे मनोरुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. अनेक लोकांना आपल्याला मानसिक आजार झाला आहे याची जाणीवही झालेली नसते. जे लोक दारूच्या नशेत असतात किंवा म्हातारपणीच्या चिंतेत असतात त्यांना मानसिक आजारांचा जास्त धोका आहे असे डॉक्टरांनी सांगितले आहे. तसेच अनुवंशिकतेने ज्यांना आजार होता त्यांनाही मानसिक आजार होण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.