हातकणंगले तालुक्यात साडेपाच हजार जण होम क्वारंटाईन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हातकणंगले तालुक्यात कोरोनाचा एक रुग्ण सापडल्यानंतर प्रशासनाची एकच धावपळ उडाली. विविध उपाययोजना करत असताना कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी खबरदारी म्हणून हातकणंगले तालुक्यात 5 हजार 502 लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. यामध्ये परदेशाहून आलेल्या 53 जणांना, तर मुंबई-पुण्याहून आलेल्या 5 हजार 449 लोकांना होम क्वारंटाईन केले असल्याची माहिती हातकणंगले तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे यांनी दिली. सध्या परदेशातून आलेल्या क्वारंटाईन केलेल्या 47 लोकांचे चौदा दिवस पूर्ण होत असून या क्वारंटाईन केलेल्या लोकांचे आणखी चौदा दिवस वाढविण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमध्ये हातकणंगले तालुक्यात एक कोरोनाचा रुग्ण सापडल्याने शहरासह तालुक्यातील गावामध्ये प्रचंड खबरदारी घेवून अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याबाबत हातकणंगले तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुहास कोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अशी माहिती दिली की, हातकणंगले तालुक्यात परदेशातून आलेल्या 53 लोकांना क्वारंटाईन तर मुंबई-पुण्याहून आलेल्या 5 हजार 449 लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. सध्या लॉकडाऊन सुरूच आहे यामुळे परदेशातून आलेल्या बहुतांशी लोकांचा चौदा दिवसांचा होम क्वारंटाईन संपत असला तरी आणखी चौदा दिवस क्वारंटाईन वाढविण्याबाबतचा निर्णय घेत असल्याचे डॉ. कोरे यांनी सांगितले. तालुक्यातील सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. कोरोना रुग्ण सापडलेल्या शहर व परिसरातील गावांचा सर्व्हे सुरु केला असल्याचे त्यांनी सांगितले.