पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी एक रुग्ण ‘कोरोनामुक्त’; 12 पैकी 10 रुग्ण ठणठणीत, केवळ दोन रुग्ण कोरोनाग्रस्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात दाखल असलेला आणखी एक रुग्ण ‘कोरोनामुक्त’ झाला आहे. या रुग्णाची दुसरी चाचणी निगेटीव्ह आली असून रुग्णाला घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे 12 पैकी 10 रुग्ण ठणठणीत झाले आहेत. शहरात आता केवळ 2 रुग्ण कोरोनाबाधित आहेत. मागील 11 दिवसात एकही नवीन कोरोनाचा पॉझिटीव्ह रुग्ण आढळला नाही.

हा रुग्ण अमेरिकेतून शहरात आला होता. या रुग्णाला 17 मार्च रोजी महापालिका रुग्णालयात दाखल केले होते. या रुग्णाचे 14 दिवसांचे पहिले रिपोर्ट सोमवारी (30 मार्च) निगेटीव्ह आले होते. त्यानंतर दुसरे रिपोर्ट देखील आज निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे हा रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे. या रुग्णाला घरी सोडण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 12 मार्च रोजी कोरोनाचे पहिले तीन रुग्ण ‘पॉझिटीव्ह’ आढळले होते. हे तीन रुग्ण शुक्रवारी (27 मार्च) ‘कोरोनामुक्त’ होत ठणठणीत झाले. तर, शनिवारी (28 मार्च) आणखी सहा रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मागील पाच दिवसात 10 रुग्ण कोरोनामुक्त होत घरी गेले आहेत. शहरात आता केवळ दोन कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत.