जेएनपीटी बंदराच्या प्रवेशद्वारावर शेकडो ट्रक- ट्रेलर्सच्या रांगा, वाहन चालकांवर उपासमारीचे संकट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारच्या संचारबंदीच्या आदेशानंतर जेएनपीटी बंदराच्या प्रवेशद्वारापासून महामार्गापर्यंतच्या परिसरात मागील आठ दिवसांपासून कंटेनर मालाची वाहतूक करणाऱ्या शेकडो ट्रक- ट्रेलर्सच्या दुतर्फा रांगा लागल्या आहेत. सर्वच राज्यातील सीमा सिल करण्यात आल्यानंतर पुढील प्रवासही शक्य होत नसल्याने शेकडो चालक- क्लिनरवर उपासमारीचे संकट उभे ठाकले आहे.

उरण परिसरातील जेएनपीटी बंदरावर खासगी आणखी चार बंदरे उभारण्यात आली आहेत. या बंदरातून प्रचंड प्रमाणात होणाऱ्या आयात निर्यात व्यापारामुळे दररोज सहा ते सात हजार कंटेनरची वाहतूक होते. दरम्यान कोरोनाच्या महामारीला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात संचारबंदीचे आदेश दिले आहेत.

या आदेशाची अंमलबजावणी युध्दपातळीवर केली जात आहे. देशभरात लॉकडाऊन आणि संचारबंदीचे आदेश जारी केले असले तरी देशभरातील बंदरे अत्यावश्यक सेवेत मोडली जात आहेत. त्यामुळे जेएनपीटीसह सर्वच बंदरातून कंटेनर हाताळणी करण्याचे काम सुरू आहे. अत्यावश्यक सेवेमुळे बंदरातील कामकाज सुरू असले तर जेएनपीटी बंदराच्या प्रवेशद्वारानंतर कंटेनर वाहतूक करणाऱ्या ट्रक- ट्रेलर्सना कोरोनाचा प्रार्दुर्भाव रोखण्यासाठी जिथे असाल तिथेच थांबण्याचा सुचेना केलेल्या आहेत. त्यातच देशभरातील राज्याच्या सीमाही सील करण्यात आलेल्या आहेत.
त्यामुळे पुढील प्रवासही शक्य होत नसल्याने मात्र शेकडो चालक- क्लिनरवर उपासमारीचे संकट उभे ठाकले आहे. मागील आठ दिवसांपासून रस्त्याच्या बाजूला वाहने पार्क करून ठेवण्यात आली असल्याचे ट्रक- ट्रेलर्स चालकांनी सांगितले. खाण्यापिण्याची मोठ्या प्रमाणात आबाल होत असुन कुटुंबीयांची ओढ लागुन राहीली असल्याची व्यथाही बहुतांश चालकांनी मांडली. गाडीतच जेवण करतो.आंघोळीचीही व्यवस्था नाही. गाडीत असलेले अन्नधान्यही संपले आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या अभावी उपासमारीचे संकट उभे राहिले असल्याचेही वाहन चालकांकडून सांगितले जात आहे.