शुक्रवारपासून हिंगोली जिल्ह्यात तीन दिवस संपूर्ण बाजारपेठ बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंगोली जिल्ह्यात कोरोनाग्रस्त पहिला रुग्ण आढळून आल्यावर जिल्हा प्रशासनाने कठोर उपाययोजना करण्यासाठी आजपासुन अर्थात 3 ते 5 एप्रिलपर्यंत तीन दिवस जिल्हाभरात संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी 2 एप्रिल रोजी हे आदेश काढले असून अत्यावश्यक सेवा वगळता रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई केली जाणार आहे.

कोरोना पार्श्वभुमीवर हिंगोली शहरासह जिल्ह्यात 14 एप्रिल संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. नागरिकांना जीवनावश्यक वस्तू भाजीपाला व किराणा सामान खरेदी करण्याकरिता एक आड वेळापत्रक निश्चित केले आहे. मात्र, या वेळेव्यतिरिक्त दुचाकी व चारचाकी वाहने वैद्यकीय आपत्कालीन या नावाखाली मोठ्या प्रमाणात रस्त्यावर फिरत असल्याचे आढळून आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे संचारबंदीच्या काळात शासकीय वाहन, वैद्यकीय कारणास्तव परवाना घेतलेले वाहन व अत्यावश्यक सेवा पुरवठा करण्यासाठी परवानगी घेतलेली वाहने, अत्यावश्यक सेवेमधील अधिकारी व कर्मचारी (कार्यालयीन ओळखपत्र असलेले) यांची वाहने सोडून या व्यतिरिक्त इतर दुचाकी तीनचाकी चारचाकी वाहनांना रस्त्यावर फिरण्यासाठी 3 ते 5 एप्रिलपर्यंत बंदी करण्यात आली आहे. तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी हिंगोली जिल्ह्यातील सर्व दुकाने, बाजारपेठा, किराणा व भाजीपाला यासह 3 ते 5 एप्रिल या तीन दिवसाकरीता संपूर्णपणे बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी 2 एप्रिल रोजी काढले आहेत. वैद्यकीय कारणास्तव बाहेर जायचे असेल तर शासकीय रुग्णवाहिका बोलवावी अथवा पोलीस नियंत्रण कक्ष किंवा जिल्हाधिकारी, तहसील कार्यालयात संपर्क साधुन परवानगी घ्यावी असे बजावण्यात आले आहे.

वसमतच्या सीमा सील
हिंगोली जिल्ह्यात आढळुन आलेला पहिला कोरोनाग्रस्त रुग्ण वसमत नगर परिषद हद्दीतील आहे. त्यामुळे वसमत शहराच्या सर्व सीमा बंद करून बाहेर येण्यासाठी व जाण्यासाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच जिल्हा प्रशासनाने वसमतचा तीन किमी चा परिसर काँटोंनमेन्ट भाग घोषित केला आहे.

गावात फिरणाऱ्यांची नोंद ठेऊन कार्यवाही करणार – उपजिल्हाधिकारी चोरमारे
हिंगोलीचे उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे यांनी हिंगोली व सेनगाव या दोन तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्व गावात विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची नोंद ठेऊन दैनंदिन अहवाल उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमेलवर पाठवण्याचे आदेश काढले आहेत. 14 एप्रिलपर्यंत संचारबंदी असून या कालावधीत संबंधित गावातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील यांनी गावात फिरणाऱ्यांची नोंद घेऊन दररोज सायंकाळी 6 वाजता अहवाल पाठवावा असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.

हिंगोली व सेनगावचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक यांच्यामार्फत गाव पातळीवर हे आदेश पोहोंचवण्यात आले असुन या अहवालानुसार आदेश मोडणाऱ्याविरुद्ध कार्यवाही केली जाईल, असा इशारा उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे यांनी दिला आहे.