माहिती लपवून ठेवणाऱ्यांवर कारवाईची कोल्हापूरकरांची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोल्हापूर मधील पोलिसांच्या छाप्यात मुस्लिम बोर्डिंग एज्युकेशन सोसायटीच्या इमारतीत आज उत्तर प्रदेश, गाजीयाबाद आदि ठिकाणाहून आलेले काही परप्रांतीय वास्तव्यास असल्याचे आढळून आले. कोरोना प्रादुर्भाव वाढत असतानाही प्रशासनापासून ही माहिती लपविल्याप्रकरणी संबंधित संस्थेचे चेअरमन आणि प्रशासकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार आणि विजय देवणे यांनी केली. मागणीचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांना देण्यात आले.

दरम्यान तबलीगसाठी दिल्ली येथे जिल्ह्यातील काही नागरिक गेले आहेत. त्यांची वैद्यकीय तपासणी झाली पाहिजे, त्याशिवाय त्यांना आसरा देणा-यांवरही गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

जगभरात कोरोना कोवीड-19 चे थैमान सुरू आहे. देशातही पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. कोरोना संदर्भात अफवा पसरवणे हा दखलपात्र गुन्हा आहे. विरोषत: रोग्यांना लागण होऊन सुद्धा ती झालीच नाही, किंवा मुद्दाम त्यांचा ठावठिकाणा चुकीचा सांगणे ही गंभीर चूक असून, हजारोंच्या मृत्यूला कारणीभूत ठरू शकते. जिल्हा दंडाधिकारी व पालकमंत्री अधिकृत वस्तुस्थिती सांगत असताना, कोणी ऐरागैरा पत्रकबाजी करून खोटारडेपणाचे नख कोल्हापूरकरांना लावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर कारवाई का करण्यात येत नाही, असा सवाल या निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.

मुस्लीम बोर्डिंग दसरा चौक येथे पोलीसांनी टाकलेल्या छाप्यात काही परप्रांतीय गेल्या काही दिवसांपासून रहात असल्याचे निर्दशनास आले. गाझीयाबाद,उत्तर प्रदेश येथुन आलेल्या या परप्रांतीयांची पोलीसांनी वैद्यकीय तपासणी करून, इन्स्टिट्युट क्वारंटाईन दाखल केले. त्यामुळे संबंधित परप्रांतीयांबाबत प्रशासनाकडून माहिती लपवुन ठेवली काय याचा तपास होऊन बोर्डिंगचे चेअरमन तसेच प्रशासकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच दिल्ली येथील निजामुद्दीन भागात धार्मिक कार्यक्रमात जिल्हयातील सहभागी झालेल्यांना जर कोणी वैद्यकीय तपासणीशिवाय आसरा दिला तर त्यांच्यावरही गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अशीही यावेळी मागणी करण्यात आली.