
पोलिसांवर सातत्याने संशयाने पाहण्याची वृत्ती असलेल्यांच्या डोळ्यात फरासखाना पोलिस ठाण्यातील दोन पोलीस नाईकांनी झणझणीत अंजन घातले आहे. कोरोनाच्या विळख्यामुळे देहविक्री व्यवसायावर विपरित परिणाम झाल्यामुळे बुधवार पेठेतील हजारो महिलांवर उपासमारीची वेळ आली होती. मात्र, फरासखाना पोलिस ठाण्यातील दोन पोलीस नाईकांनी स्वतःसह इतरांकडून मदत घेऊन वारांगनाला मदतीचा हात दिला आहे. पोलीस नाईक सचिन कुटे आणि नाना भांदुर्गे यांनी पुढाकार घेउन तब्बल साडेतीन हजार वारांगनाला अन्नधान्यांसह खाद्यपदार्थ पोहोच केले आहे.
कोरानामुळे बुधवार पेठेतील देहविक्री व्यवसाय पुर्णतः ठप्प झाला आहे. त्यातच लॉकडाउन झाल्यापासून संबंधित महिलांवर उपासमारीची वेळ आली होती. मात्र, अशावेळी सामाजिक बांधिलकी जपत पोलिस नाईक कुटे आणि भांदुर्गे यांनी गाजावाजा न करता महिलांना मदत करण्यास सुरुवात केली. वैयक्तिक संपर्कातून त्यांनी नगरसेवक, दुकानदार यांच्यासह मित्रांकडून अन्नधान्य एकत्रित केले. त्यानंतर बुधवार पेठेतील महिला, तृतीयपंथींना अन्न पॅकेट, धान्याचे वाटप केले. त्यामध्ये प्रत्येक महिलेला एका महिन्याचे धान्य पुरविण्यात आले. शिवाय त्यांच्या सुरक्षिततेसाठी सॅनिटायझर, मास्कही देण्यात आले. आतापर्यंत या दोन्ही पोलीस नाईकांनी तब्बल साडेतीन हजार महिलांना एक महिन्याचे अन्नधान्य पोहोच केले आहे.
मागील दहा ते बारा दिवसांपासून हे दोन्ही कर्मचारी बुधवार पेठेतील महिलांना खाद्यपदार्थ वितरित करीत आहेत. एकंदरीत कोरोनामुळे चुलबंद होण्याच्या अवस्थेत सापडलेल्या बुधवार पेठेतील महिलांसाठी दररोज नित्याने मदत गोळा करीत दोघांनी खाकीतील माणुसकी दाखविली जात आहे. त्यांच्याकडून दररोज ड्युटी सांभाळून सकाळी आणि संध्याकाळी अन्नधान्याचे वाटप केले जात आहे. त्यासाठी स्थानिक नगरसेवक, दुकानदार, मित्र, पोलिस खात्यातील कर्मचार्यांकडून मदत स्वीकारली जात आहे. त्यानंतर अन्नधान्याची खरेदी करुन वाटप केले जात आहे. त्यामध्ये धान्य, किराणा माल, कडधान्ये, पीठ, तांदूळ, गहू, दाळ, मसाल्याचा समावेश आहे. दरम्यान, लॉकडाउनमुळे अनेक वारांगणाची मुले गल्लीत आली आहेत. त्यांच्या सुरक्षिततेसाठी दोन्ही कर्मचार्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. शासनाकडून महिलांसह मुलांसाठी काम केले जात आहे. मात्र, ड्युटी सांभाळून सामाजिक बांधिलकी जपणार्या पोलीस नाईक सचिन कुटे, नाना भांदुर्गे यांचे कार्य कौतुकास्पद आहे.
फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वारांगणाला मदत करणार्या पोलीस नाईक सचिन कुटे आणि नाना भांदुर्गे यांनी पुढाकार घेतला आहे. सामाजिक संस्था, दुकानदार, कर्मचारी, मित्रांकडून आर्थिंक आणि धान्य स्वरुपात मदत घेउन बुधवार पेठेतील बहुतांश सर्वच महिलांना जवळपास एक महिनाभर पुरेल एवढा अन्नधान्यांचे वितरण करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्या सूचनेनुसार संकट काळातही पोलिसांनी माणुसकी जपण्याचा प्रयत्न केला आहे, अशी प्रतिक्रिया फरासखाना पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिली आहे.




























































