जालन्यात आढळली महिला कोरोना रुग्ण, धाकधुक वाढली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना जिल्ह्यात आतापर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नव्हता. त्यामुळे जालनाकरांत समाधान होते. परंतु आता कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्याने त्यांच्या मनात धडकी भरली आहे. या महिला रुग्णाचा प्रवास इतिहास असून ती सौदी अरेबियातून आली असल्याचे सांगण्यात येत आहे.

जालना शहरात कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याने पोलीस बंदोबस्त अधिक कडक करण्यात आला आहे. जिल्हा रुग्णालयाकडून जिल्हा प्रशासनाला नुकताच अहवाल देण्यात आला असल्याचेही सांगण्यात येत आहे. जालना जिल्ह्यात एकही रुग्ण नव्हता, जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून 213 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. तर रविवारी 32 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.

त्यापैकी 1 रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे, तर इतर सर्व रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आहेत. सदर रुग्णावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुरुवातीपासून आतापर्यंत 213 जणांपैकी 176 जणांचे रिपोर्ट आले असून ते निगेटिव्ह आहेत. तर उर्वरित काही जणांचे रिपोर्ट रविवारी सायंकाळपर्यंत येणे अपेक्षित असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.