
देशभरात कोरोनामुळे लॉकडाऊन असल्यामुळे दारूची दुकाने पूर्णत: बंद आहेत. अशात एका तळीरामांचे फारच वांदे झाले आहेत. दारूचे व्यसन असलेले अनेकजण सरकारला दारूची दुकाने काही काळासाठी तरी खोला अशी विनंती करत आहेत. मात्र आता 15 दिवस झाले तरी दारू मिळत नसल्याने तळीरामांचा घसा कोरडा झाला आहे. तामिळनाडूत अशाच तीन व्यसनाधीन तळीरामांनी दारू तयार करायचा प्रयत्न केला. त्यांनी लाकडाला चकाकी आणण्यासाठी वारण्यात येणारे पेंट वॉर्निश पाण्यात मिसळून प्यायले.यात त्यांच्या मृत्यू झाला आहे.
तामिळनाडूतील चेंगालपेट जिल्ह्यात ही घटना घडली असून या जिल्ह्यातील सेंदोरा गावात हे तिघेही राहायचे. त्या तिघांनाही दारुचे व्यसन होते. गेल्या काही दिवसांपासून दारू मिळत नसल्याने ते कासाविस झाले होते. त्यातच कुणीतरी त्यांना पेंट व्हार्निशमध्ये पाणी मिसळले तर दारू तयार होते असे सांगितले. त्यामुळे त्यांनी एका सुताराकडून पेंट व्हार्निश मिळवले. त्यात पाणी मिसळून ते प्यायले. मात्र थोड्याच वेळात त्यांना उलट्यांचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले. तिथे उपचारादरम्यान त्या तिघांचाही मृत्यू झाला.
गेल्या काही दिवसात दारू मिळत नसल्याने दारूची दुकाने फोडल्याच्या, आत्महत्या केल्याच्या बऱ्याच घटना समोर आल्या आहेत. एकट्या केरळमध्ये दारूच्या व्यसनातून नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणी दारूची दुकाने फोडल्याचे समोर आले आहे.
























































