
कोल्हापूरातील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या 63 वर्षीय वृद्धेचा कोरोनाचा अहवाल आज पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.योगेश साळे यांनी दिली. यापूर्वी पुण्याहुन कोल्हापूरात नातेवाईकांकडे आलेल्या तरुणाचा अहवाल पाॅझीटिव्ह आला होता. दोन दिवसांनी त्या तरुणाच्या बहिणीचाही अहवाल पाॅझीटिव्ह आला होता. त्यानतर दहा दिवसांत जिल्ह्यात एकही करोना पाॅझीटिव्ह रुग्ण आढळला नव्हता.
कसबा बावडा, मराठा कॉलनी परिसरात राहणारी ही महिला दि.20 व 21 मार्च रोजी सातारा येथे गेल्या होत्या. दुसऱ्याच दिवशी दि.22 ते 28 मार्च रोजी त्या कोरेगाव तालुक्यातील बनवडे येथे गेल्या होत्या. दि.28 मार्च रोजी त्या कोल्हापूरमध्ये परत आल्या. त्यानंतर दि.३० मार्च रोजी त्यांच्यात सर्दी,ताप, खोकला अशी लक्षणे दिसून आली. दुसऱ्याच दिवशी दि.31 मार्चला खासगी रुग्णालयात उपचार घेतला. दि.3 एप्रिल रोजी बावड्यातील सेवा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात दाखल करुन त्यांचा स्वॅब घेण्यात आला.याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला. दरम्यान त्यांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेऊन त्याबाबत पुढील खबरदारीचे उपाय म्हणून कार्यवाही सुरु आहे.
































































