
हरियाणातून लातूरच्या निलंगातील मशीदीत आलेल्या 12 जणांपैकी आठ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यातील तीन रुग्णांचे अहवाल फेरतपासणीमध्ये निगेटिव्ह आले असून एकाचा अहवाल प्रलंबित आहे. या वृत्ताने लातूरसह राज्याला दिलासा मिळाला आहे.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत 8 एप्रिलला एकूण 46 व्यक्तींची तपासणी करून त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. आतापर्यंत एकूण 140 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी एकूण 103 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील मशिदीतून नागरिकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी 12 जणांना ताब्यात घेतले होते. त्यांची वैद्यकीय तपासणी करून स्वॅब तपासणीस पाठवण्यात आले असता बारापैकी आठ जणांना कोरोनाची लागण असल्याचे स्पष्ट झाले होते. त्या सर्वांचे स्वॅब पुन्हा एकदा तपासणीसाठी पाठवण्यात आले असता त्यातील तिघांचा अहवाल निगेटिव्ह आला असून एकाचा अहवाल प्रलंबित आहे. आठ पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या 26 डॉक्टर्स, नर्स, वर्ग 4 च्या कर्मचाऱ्यांपैकी 25 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे तर एकाचा अहवाल प्रलंबित आहे.





























































