
पनवेलमध्ये कोरोनाने एकाचा मृत्यू झाला असला तरी आता पनवेलकरांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. गेल्या 48 तासात महणजे दोन दिवसात पनवेल महापालिका आणि पनवेल ग्रामीण क्षेत्रात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. पनवेलमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 21 झाली आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 17 तर पनवेल ग्रामीण क्षेत्रात 4 असे एकूण 21 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रातील 17 रुग्णांपैकी 4 रुग्ण बरे झाले आहेत. खारघरमधील घरकुल कॉलनीत एकूण 3 कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर पालिका आयुक्त आयुक्त डॉ. गणेश देशमुख यांनी गांभीर्याने दखल घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. घरकुलचे निर्जंतुकीकरण केले. स्थानिक नगरसेवक निलेश बाविस्कर यांनीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडे पाठपुरावा करून निर्जंतुकीकरण करून घेतले. घरकुलमध्ये वास्तव्य करणाऱ्या एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. ही व्यक्ती ही डेंग्यूने आजारी होती. मात्र, कोरोनाचा संसर्ग झाल्याने दुर्दैवी घटना घडली. घरकुलवासीयांसाठी ही चिंतेची बाब असली तरी काळजी करण्यासारखी नाही. त्या व्यक्तीच्या कुटुंबियांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने संसर्ग घरकुलमधून झाला नसल्याचे पालिका आयुक्त डॉ. गणेश देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. घरकुलमधील अगोदरच्या दोन रुग्णांपैकी एकजण बरा झाला असून दुसऱ्याची प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे घरकुलवासीयांनी घाबरून जाऊ नये, असा दिलासा आयुक्तांनी दिला आहे. मात्र, काळजी घ्या, घराबाहेर पडू नका, असे आवाहन पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.

























































