
रोगराई टाळण्यासाठी मुंबईतील कचऱ्याची विल्हेवाट जैविक पद्धतीने लावण्याचा महत्वपूर्ण निर्णय पालिकेने घेतला आहे. याची अंमलबजावणी देखील सुरू करण्यात आली असून विविध ठिकाणचा कचरा उचलल्यानंतर संबंधित जागा निर्जंतुकही करण्यात येत आहे. दरम्यान, लॉकडाऊनच्या कालावधीत मुंबईतील कचऱ्याचे प्रमाण 35 टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे.
मुंबई महानगरपालिकेने 2 ऑक्टोबर 2017 पासून सोसायट्यांना कचर्याचे व्यवस्थापन करणे बंधनकारक केले आहे. यामध्ये 20 हजार चौरस मीटरपेक्षा मोठ्या गृहनिर्माण सोसायट्या आणि 100 किलोंपेक्षा जास्त कचरा निर्माण होणार्या इमारती-आस्थापनांना ओल्या कचर्याच्या विल्हेवाटीचे व्यवस्थापन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
कचराव्यवस्थापन मोठ्या प्रमाणावर करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी पालिकेने कचर्याचे वर्गीकरण, ओल्या कचर्यापासून खतनिर्मिती, सुक्या कचर्याची विल्हेवाट, टाकाऊ पाण्याचा पुनर्वापर किंवा पर्जन्य जल संधारण योजना राबविणार्या सोसायट्यांना मालमत्ता करात पाच टक्के सवलत अशी योजनाही राबवण्यात येत आहे. शिवाय सुक्या कचर्याच्या विल्हेवाटीसाठी मुंबई शहर, पूर्व-पश्चिम उपनगरात दिवसाला 50 मेट्रिक टन कचरा विल्हेवाटीची क्षमता असणार्या केंद्र सुरू करण्याचा निर्णयही घेतला आहे. पालिकेने गेल्या काही दिवसांत कचरा व्यवस्थापनासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे दररोजच्या साडेसात हजार टन कचऱ्याचे प्रमाण दररोज सुमारे साडेपाच हजार मेट्रिक
टन इतके कमी झाले आहे.
सध्या मुंबईत कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे कचऱ्याचे प्रमाण आता 30 ते 35 टक्क्यांनी कमी झाल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. शिवाय रोगराईला आळा घालण्यासाठी कचऱ्याची विल्हेवाट जैविक पध्द्तीने लावण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
म्हणूनच घेतला निर्णय
कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर पालिकेने सुमारे 300 प्रतिबंधित क्षेत्रे जाहीर केली आहेत. मात्र या ठिकाणी स्वच्छता राखणे हे अत्यंत महत्वाचे असून घनकचरा विभागाचे सफाई कामगार जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य चोख बजावत आहेत. या बाधित क्षेत्रात जंतूनाशक फवारणी करून निर्जंतुकीकरण केले जात असले, तरी याठिकाणी निर्माण होणारा कचरा तेवढा घातक ठरु शकतो. या कचऱ्यामुळे होणारा संसर्ग रोखण्यासाठी पालिकेने जैविक पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला आहे.
अशी होतेय कार्यवाही
बाधित क्षेत्रातील कचऱ्याची दैनंदिन विल्हेवाट लावण्यासाठी प्रत्येक बाधित क्षेत्रातील कचरा स्वतंत्र गोळा करून त्याचे निर्जंतुकीकरण केले जाते. तो वेगळ्यापध्दतीने वाहून नेत देवनार डम्पिंग ग्राऊंडवर खोलवर खड्डा खणत त्याची विल्हेवाट लावण्यात येते. यावेळी दोन्ही वेळा जंतूनाशकाची फवारणी करून तो परिसर पुन्हा निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.
























































