
मुंबईवरील कोरोनाचे वाढते संकट रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेका तीन हजारहून जास्त इंटर्न डॉक्टर, वैद्यकीय विद्यार्थी व परिचारिका यांना कोरोना व्हायरस हाताळण्याचे प्रशिक्षण देणार असून आतापर्यंत त्यातील 1 हजारहून जास्त डॉक्टरांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. यामुळे अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध होऊन कोरोनाच्या रुग्णांना अधिक प्रभावी आणि जलद सेवा देणे पालिकेला शक्य होणार आहे.
मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढले असून त्यांच्यावर पालिका तसेच खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. संशयित रुग्णांना क्वारंन्टाईन केले जात आहे तर पॉझिटिव्ह रुग्णांना आईसोलेशन वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. कोरोना पॉझिटिव्ह सापडलेल्या परिसरामध्ये निर्जंतुकीकरणाचे काम सुरू आहे. मात्र , त्यांच्याबरोबर मुंबईतील कोरोना रुग्णांवर अधिक प्रभावी उपचार करता यावेत, यासाठी पालिका वैद्यकीय सेवेतील मनुष्यबळ वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयात आंतरवासिता (internship) करत असलेले 417 इंटर्न डॉक्टर्स, एमबीबीएसच्या चौथ्या वर्षाचे 662 विद्यार्थी आणि महापालिकेच्याच परिचारिका महाविद्यालयातील दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाच्या 468 विद्यार्थिनी असे एकूण 1547 जणांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. त्यांना बोरिवली येथील महापालिकेच्या नागरी प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणामध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करताना काय काळजी घ्यावी, उपचारांचा क्रम कसा असावा? व्हेंटिलेटर चा वापर केव्हा व कसा करावा? इत्यादीबाबत माहिती देऊन प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले जात आहे.
‘या’ चार रुग्णालयात प्रशिक्षण
सध्या प्रशिक्षण पूर्ण झालेल्या 1547 डॉक्टरांव्यतिरिक्त आणखी 1709 डॉक्टर्स, नर्सेस यांचे प्रशिक्षण आजपासून महापालिकेच्या केईएम, नायर, टिळक व हिंदुहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय या चार वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये / रुग्णालयांमध्ये सुरू आहे. त्यामुळे पालिकेकडे कोरोना हाताळण्याची क्षमता असलेले अतिरिक्त 3 हजार 256 डॉक्टरांचे मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या आणि प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थींना येणे जाणे सोयीचे व्हावे, यासाठी बेस्ट बसेसची सुविधा महापालिकेद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे
देशात सर्वाधिक कोरोना चाचण्या मुंबईत
करोना नियंत्रणासाठी मुंबई महापालिका अहोरात्र कार्यरत असून संशयित आणि कोरोनासदृश लक्षणे आढळलेल्याच्या कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. यात पालिका आणि खासगी लॅबचाही समावेश आहे. मुंबईत 3 फेब्रुवारी ते 10 एप्रिलपर्यंत कोरोनाच्या 19 हजार 541 चाचण्या झाल्या असून देशभरातील हा उच्चक आहे. कोरोना संशयितांच्या तातडीने चाचण्या करून रूग्ण पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांना तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे.


























































