
‘कोरोना’ विरुद्धच्या युद्धात ठाणे महानगरपालिका पूर्ण ताकदीनिशी उतरली असून सर्व उपाययोजनांचा अवलंब सध्या करण्यात येत आहे. संशयित रुग्णांची चाचणी लवकरात लवकर व्हावी, तसेच ‘कोरोना’ नाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता पालिकेच्या वतीने ‘ड्राईव्ह थ्रू ‘ चाचणी सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे 24 तासात या चाचणीचा अहवाल हाती येणार असल्याने तातडीने संबंधित रुग्णावर उपचार करणे शक्य होणार आहे. दरम्यान, महानगरपालिका क्षेत्रातील ‘कोरोना’ बाधित रुग्णांची संख्या 76 वर पोहोचल्याने पालिकेने विशेष काळजी घेतली आहे.
कॅडबरी जंक्शन आणि कळवा नाका येथे इन्फेक्शन लॅबच्या माध्यमातून ड्राईव्ह थ्रू पद्धतीने स्वॅब टेस्टींगची सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. या सुविधेमुळे नागरिकांना स्वॅब तपासणीसाठी आता कुठल्याही लॅबमध्ये जाण्याची गरज नसून ॲानलाईन नोंदणी केल्यानंतर दिलेल्या वेळेत जाऊन कोरोनाची चाचणी करता येणे शक्य झाले आहे. शिवसेना नेते व पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर नरेश म्हस्के, आयुक्त विजय सिंघल यांच्या पुढाकाराने ही चाचणी सुरू करण्यात आली आहे.
डॉक्टर्स व प्रशिक्षित कर्मचारी
या तपासणी केंद्रात तज्ज्ञ डॉक्टर व प्रयोगशाळा तंत्रज्ञ व प्रशिक्षीत कर्मचारी वर्ग नेमण्यात आला असून सकाळी 10 ते 6 या वेळेत ही चाचणी करण्यात येते. दरम्यान तपासणीसाठी येताना ऑनलाईन नोंदणीची आणि पैसे भरल्याची पावती घेवून स्वत:च्या बंदिस्त चारचाकी वाहनातूनच त्यांना बूथवर येणे अनिवार्य असणार आहे. व्यक्तीचे वाहनातच स्वॅब घेण्यात येतात. तपासणीनंतर त्याचा अहवाल त्या व्यक्तीस तसेच ठाणे महापालिकेस ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. इन्फेक्शन लॅबच्या माध्यमातून ज्यांना कोरोना चाचणी करावयाची आहे त्यांना http://infexn.in/COVID-19.html या लिंकवर तपासणीसाठी ॲानलाईन पद्धतीने नोंदणी करता येईल.































































