
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संभाजीनगर महापालिकेने शहरात जंतूनाशक औषधांची फवारणी सुरू केली आहे. अग्निशमन विभागाची वाहने त्यासाठी वापरली जात आहेत. मात्र, ही वाहने गल्लीबोळात जात नसल्यामुळे 18 नवीन हायपॉवर फवारणी मशीन खरेदी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
कोरोना रुग्णांची संख्या शहरात दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे महापालिकेने शहरात जंतुनाशकांची फवारणी सुरू केली आहे. सुरुवातीस प्रमुख चौक, मुख्य रस्ते, महत्त्वाच्या कार्यालयांमध्ये फवारणी करण्यात आली. ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आढळून आले, असा भागही निर्जंतुक करण्यात आला. या फवारणीसाठी अग्निशमन विभागाची मोठा वाहने वापरली जात आहेत. मात्र ही वाहने गल्लीबोळात जात नसल्यामुळे काही दिवसांपूर्वी देवगिरी महाविद्यालयाच्या विद्यार्थाने तयार केलेले छोट्या नऊ मशीन खरेदी करण्यात आल्या होत्या. या मशीनही कमी पडत असल्याने आता प्रत्येक प्रभागासाठी दोन अशा 18 मशीन खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिक येथील युनिक अॅग्रो एजन्सीकडून या हायपॉवर मशीन खरेदी केल्या जाणार असून, 1 लाख 10 हजार रुपये एवढी एका मशीनची किंमत आहे.


























































