लॉकडाऊनमुळे हिंदुस्थानचा जीडीपी शून्यावर जाणार,‘बार्कलेज’ संस्थेचा अंदाज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनामुळे देशात लॉकडाऊन पुन्हा 3 मे पर्यंत वाढवला गेला आहे. मात्र या वाढवण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हिंदुस्थानातील अर्थव्यवस्थेला जबर फटका बसणार आहे. देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) शून्यावर पोहोचण्याचा धोका ‘बार्कले’ या ब्रिटीश संस्थेने व्यक्त केला आहे.

‘बार्कले’ ही संस्था जगातील देशांमधील अर्थव्यवस्थेचा अभ्यास करते. 2020 च्या अखेरीपर्यंत हिंदुस्थानचा जीडीपी दर शून्य टक्क्यांवर येण्याची शक्यता या संस्थेने व्यक्त केली आहे. त्याचबरोबर 2020-21 या आर्थिक वर्षात म्हणजेच 31 मार्च 2021 पर्यंत तो 0.8 टक्क्यांवर जाण्याचा अंदाजही बार्कलेने मांडला आहे.

कोरोनामुळे गेल्या 22 मार्चला लॉकडाऊन जाहीर झाला त्यावेळीही बार्कलेने हिंदुस्थानच्या जीडीपीबाबत अंदाज व्यक्त केला होता. 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन राहिले तर जीडीपी दर 2.5 टक्क्यांपर्यंत घसरेल असे बार्कलेने म्हटले होते. परंतु आता लॉकडाऊन पुन्हा वाढवला गेल्याने अर्थव्यवस्थेवर गंभीर आणि दूरगामी परिणाम होतील असे बार्कलेच्या तज्ञांचे मत आहे.

3 मे पर्यंत होणार 18 लाख कोटींचे नुकसान

25 मार्च ते 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला आठ लाख कोटी रुपयांचे नुकसान होईल असा अनुमान व्यक्त केला गेला होता. आता 3 मे पर्यंत जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हा आकडा 17 लाख 87 हजार कोटी रुपयांवर जाण्याची शक्यता बार्कलेने व्यक्त केली आहे.