
मुंबईकरांना पुरेशा प्रमाणात भाजी मिळावी यासाठी पालिकेच्या माध्यमातून तात्पुरत्या तत्वावर अतिरिक्त भाजी विक्री केंद्रे सुरू करण्यासाठी परवाने देण्यात येणार आहेत. मात्र ही भाजी विक्री केंद्रे सुरू करताना गर्दी टाळण्यासाठी दोन विक्रेत्यांमध्ये 20 फुटांचे अंतर तर दोन ग्राहकांमध्ये साडेतीन फुटांचे (एक मीटर) अंतर ठेवण्यात येणार आहेत. मुंबईत ’कोरोना’चा प्रसार वाढत असतानाही नागरिकांची भाजी खरेदीसाठी होणारी झुंबड रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ही सुविधा ’कंटेनमेंट झोन’मध्ये (प्रतिबंधित क्षेत्र) मिळणार नाही.
‘कोरोना’चा प्रसार वाढत असताना आणि लॉकडाऊन सुरू असताना अनेकजण भाजी खरेदीसाठी नाहक गर्दी करीत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळेली 283 ठिकाणे ’प्रतिबंधित’ क्षेत्र म्हणून जाहीर केली असून या सार्वजनिक ठिकाणची भाजी विक्री बंद केली आहे. मात्र मुंबईकरांना पुरेशा प्रमाणात भाजी मिळावी यासाठी भाजी विक्री केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार भाजी फळे विक्रेत्यांना ठिकाण ठरवून देणे, वेळ ठरवून देणे, नियमांची माहिती देणे व सदर नियमांचे काटेकोरपणे पालन होत असल्याची वेळोवेळी खातरजमा करणे; इत्यादी सर्व बाबतचे नियोजन व्यवस्थापन हे महापालिकेच्या विभागस्तरीय ’सहाय्यक आयुक्त’ (वॉर्ड ऑफिसर) यां स्तरावर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. यासाठी संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक यांचे सहकार्य घेण्याचेही निर्देशित करण्यात आले आहे.
























































