125 किलोमीटरची पायपीट करत गाव गाठले; संचारबंदीमुळे गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना रोखण्यासाठी लॉक डाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सुरक्षेसाठी राज्याच्या आणि जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. असे असतानाही एका युवकाने गोव्यातील वास्कोहून 125 किलोमीटरची पायपीट करत मालवण तालुक्यातील कुमामे नागिन्देवाडी येथील आपले गाव गाठले आहे. हा प्रकार उघड झाल्यानंतर संचारबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी युवकावर गुन्हा दाखल झाला आहे.

तो युवक वास्को येथे कामाला असून 9 एप्रिल पहाटे 5 ते 10 एप्रिल दुपारी 1.30 या वेळेत युवकाने राज्याच्या सीमा बंद असताना पायी चालत गाव गाठल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार चौकशी करत पोलिसांनी त्याच्यावर कोरोना रोखण्यासाठी दिलेल्या खबरदारीच्या नियमांचे उल्लंघन करून जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी जारी केलेल्या मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी हेड कॉन्स्टेबल रुक्मांगत मुंडे अधिक तपास करत आहेत.