राज्यात 6 कोटी 80 लाख नागरिकांना रेशनच्या धान्याचे वाटप – छगन भुजबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> बाबासाहेब गायकवाड

लॉकडाऊनच्या काळात कोणीही उपाशी राहु नये, हे शासनाचे धोरण आहे. यासाठी रेशन दुकानांमधून धान्य वितरणाचे काम जलदगतीने सुरू आहे. पंधरा दिवसात राज्यात 6 कोटी 80 लाख नागरिकांना 44 लाखाहून अधिक क्विंटल धान्य देण्यात आले आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ‘सामना’ला दिली. थोड्याच दिवसात तीन कोटी आठ लाख केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात धान्य वाटप करण्यात येणार आहे, या धान्यखरेदीचा खर्च राज्य शासन करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्याची लोकसंख्या सुमारे साडेबारा कोटी आहे. अन्न सुरक्षा योजनेंतर्गत साडेसात कोटी लाभार्थीच धान्य घेण्यास पात्र आहेत, त्यातील 97 टक्के म्हणजे सहा कोटी 80 लाख नागरिकांना दोन रूपये प्रतीकिलोने गहु आणि तीन रुपये प्रतीकिलोने तांदळाचे वाटप करण्यात आले. स्थलांतरीत कार्डधारकही हा लाभ घेत आहेत. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या 34 लाख लाभार्थ्यांनी राज्यात जिथे आहे तिथे धान्य घेतले आहे.

मोफत तांदळाचे वाटप
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना नियमित स्वस्त धान्याचा लाभाच्या व्यतिरिक्त एप्रिल ते जूनपर्यंत प्रतीव्यक्ती प्रतीमहिना पाच किलो मोफत तांदुळ संपूर्ण राज्यात दिला जात आहे. या योजनेंतर्गत 15 एप्रिलपर्यंत दोन कोटी 73 लाख नागरिकांना 11 लाख क्विंटल मोफत तांदुळ देण्यात आला आहे. येत्या आठवडाभरात एप्रिल महिन्याचे हे वितरण पूर्ण होईल.

केशरी कार्डधारकांना सवलतीच्या दरात धान्य
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या लाभापासून राज्यातील 3 कोटी 8 लाख केशरी शिधापत्रिकाधारक वंचित आहेत. या शिधापत्रिकेवर प्रतीव्यक्ती प्रतीमहिना तीन किलो गहु आणि दोन किलो तांदुळ देण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाने घेतला आहे. आठ रुपये किलोने गहु, तर बारा रुपये किलो दराने तांदुळ देण्यात येणार आहे. ही योजना लवकरच अंमलात येणार आहे. यासाठी राज्य सरकार मे आणि जून या दोन महिन्यात सहाशे कोटी रुपये खर्च करणार आहे, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.

रेशनकार्ड नसलेल्यांसाठी केंद्राकडे मागणी
राज्यात सुमारे दोन कोटी लोकांकडे रेशनकार्ड नाही. यात सुमारे एक कोटी लोकांना रेशनच्या धान्याची गरज नाही, असे गृहीत धरले तरी एक कोटी गोरगरीबांना त्याची गरज आहे. त्यांना मोफत धान्य मिळावे, अशी मागणी केंद्रीय अन्न, नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशीही चर्चा सुरू आहे.

स्वयंसेवी संस्थांना अल्पदरात धान्य
अनेक स्वयंसेवी संस्थांनी अन्नछत्र सुरू केले आहे. या संस्थांना 21 रुपये किलो दराने गहु व 22 रुपये किलो दराने तांदुळ देण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी अर्ज करणे आवश्यक आहे. राज्यात शहरी आणि ग्रामीण भागात 4 हजार 532ठिकाणी अन्नछत्र सुरू आहे, पाच लाख नागरिक त्याचा लाभ घेत आहेत.

कार्यकर्त्यांनी स्वयंसेवकाचे काम करावे
रेशनचा काळा बाजार होवू नये यासाठी महसूल व पोलीस यंत्रणा लक्ष ठेवून आहेच. काही ठिकाणी फौजदारी कारवायाही झाल्या. गैरप्रकार होवू नये, धान्य वितरण सुरळीत व्हावे, प्रत्येक पात्र लाभार्थ्यांला लाभ मिळावा, यासाठी राष्ट्रवादी, शिवसेनेसह सर्वपक्षीय कार्यकर्ते यांनी स्वयंसेवकाची भूमिका बजवावी, यासाठी वेळा ठरवून आपआपल्या भागातील रेशन दुकानांवर लक्ष ठेवावे. मात्र, याचे राजकारण करू नये. फक्त नागरिकांना मदत करावी. रेशन दुकानदारावर मागचा राग काढून सूड उगवू नये. उगाच जास्त गर्दी करून लॉकडाऊनचे नियम मोडू नये, असे आवाहनही छगन भुजबळ यांनी केले.