
क्रूर कोरोनामुळे आईच्या अखेरच्या दर्शनालाही पारखे राहण्याची वेळ मुलांवर आली. ज्या आईने खस्ता खाऊन मुलांना वाढवले त्या आईच्या अंत्यविधीसाठी लॉकडाऊनमुळे जाता न आल्याने तिचे व्हिडीओ कॉलिंगवरूनच अंत्यदर्शन घेण्याची दुर्दैवी वेळ उरण आणि डोंबिवली येथील मुलांवर आली.
उरण येथे राहणारे सुनील नायर यांची 77 वर्षांची आई त्यांच्यासोबत रहात होती. काही महिन्यापूर्वीच ती दुसऱया लेकाकडे मालाड येथे राहण्यास गेली. मंगळवारी त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. परंतु लॉकडाऊनमुळे उरण येथून मुंबईला जाणे शक्य नसल्याने अखेर सुनील नायर यांनी व्हॉट्सऍप व्हिडीओ कॉलिंगवरूनच आईचे अंत्यदर्शन घेतले. अशीच हृदयद्रावक घटना डोंबिवली येथेही घडली. डोंबिवली पूर्वेतील संगमेश्वर गार्डन येथे महंतेस सगुमाले (38) हे राहतात. ते मुळचे सोलापूर जिह्यातील अक्कलकोट तालुक्यातील आहेत. महंतेस यांच्या 80 वर्षीय आई मोहनाबाई यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. परंतु त्यांच्या अंत्यदर्शनासाठी महंतेस पोहचू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी व्हिडीओ कॉलिंगद्वारेच आईचे अंत्यदर्शन घेऊन तिचा अंत्यविधी पाहिला.

























































