
यंदाचा मौसम मच्छिमारांसाठी प्रचंड आर्थिक नुकसानीचा ठरला आहे. एका मागून एक आलेली वादळांची श्रृंखला, अतिवृष्टीने ठप्प झालेली मासेमारी शेवटच्या दिवसात कोरोनाच्या संकटात कोलमडली आहे.यंदाच्या हंगामात मच्छिमारांचे जाळे रिकामेच राहिले आहे. मच्छिमारीवर आधारित छोटे व्यवसाय कोलमडले आहेत.
ऑगस्ट 2019 चा यंदाचा मच्छिमारांचा मौसम सुरु झाला तो वादळी वारे आणि अतिवृष्टीने. खवळलेला समुद्र शांत होईल आणि आपल्या नौका समुद्रात उतरतील अशा आशेवर असताना एकामागून एक वादळ घोंगावू लागली आणि कोकणातील मच्छिमारी कोलमडली. या कोलमडलेल्या मच्छिमारीचे कोरोनाच्या संकटात कंबरडे मोडले आहे. 2019 मध्ये अतिवृष्टीनंतर वादळाची एक मालिका सुरू झाली. एकामागून एक वादळ किनाऱ्यावर धडकू लागली. हिक्का, वायू वादळांचा तडाखा सहन करत असताना क्यार सारख्या वादळाने मच्छिमारांचे प्रचंड नुकसान केले. क्यार वादळात अनेक नौकांचेही नुकसान झाले होते. पाठोपाठ महा वादळाने हजेरी लावली. मच्छिमाराची वादळ’वाट’ लागल्यानंतर आता कोरोना संकटात मच्छिमारीचे कंबरडे मोडले. मत्स्य दुष्काळ त्यात वातावरणातील बदल यामुळे डिजेलच्या खर्च, खलाशांचे उत्पन्न इतका खर्चही मासेमारीतून भागवला जात नव्हता. अशावेळी हंगामाच्या शेवटी चांगले मासे मिळतील अशा आशेवर असलेल्या मच्छिमारांना पुन्हा रिकाम्या हाताने किनाऱ्यावर थांबावे लागले आहे.कोरोना सारख्या वैश्विक संकटात मच्छिमारांनी लॉकडाऊनचे पालन करत किनाऱ्यावरच नौका ठेवल्या.परंतू महिनाभरात मच्छिमारांसह त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यवसायांना फटका बसला आहे.
मच्छिमारीवर बाजारपेठेतील अनेक व्यवसाय अवलंबून आहेत.खलाशांपासून बर्फ विक्रेता, मच्छिची वाहतूक करणारा टेम्पोवाला,मासे विक्री करणाऱ्या महिला अशा अनेकांच्या रोजगारावर गेल्या वर्षभरात गदा आली आहे.वातावरणातील अनियमिता आणि कोरोना सारख्या संकटामुळे मच्छिमारांचे जाळे यंदा रिकामेच राहिले आहे.ऑगस्टपासून आज पर्यंत कितीवेळा समुद्रात मासेमारी झाली याचे संशोधन करण्याची वेळ आली आहे.कधी ओखी, वायु,क्यार, महा वादळ,कधी चक्रीवादळे हि श्रृंखला संपते तोच मतलई वारे आणि त्यात कोरोना यामुळे कोकण किनारपट्टीवरील मच्छिमारी सारखा मोठा व्यवसाय आर्थिक अडचणीत सापडला आहे.




























































