
कोरोना जागतिक साथीच्या संकटामुळे रेल्वेच्या प्रवासी वाहतूकीसह अन्य वाहतूकीची साधने बंद असताना इंधन वाहतूक करणारी मालगाडी कामनरोड येथे मेन लाईनवरच ब्रेक जाम होऊन बंद पडल्याचे लक्षात येताच ‘सीएनडब्ल्यू’ स्टाफची प्रतिक्षा करण्यात वेळ न दवडता पॉईंट्समन विनोद बटाटे यांनी गार्ड आणि स्टेशन मास्तरांच्या सहकार्याने ट्रॅकमध्ये उतरुन ती स्वत: दुरुस्त केली. पुढील प्रवासासाठी तिला वेळेत रवाना केले. मध्य रेल्वेच्या या पॉईंट्समनचे सर्वत्र कौतुक होत आहे.
भिवंडी सेक्शनच्या खारबाव स्टेशनवरून काल रात्री एक संदेश मिळाला की कामनरोड स्थानकात फलाट क्रमांक ४ वर रात्री आठ वाजताच्या सुमारास एक मालगाडी बिघडली आहे. स्टेशन मास्तरांचा संदेश येताच पॉईंट्समन विनोद भटाटे घटना स्धळी पोहोचले. त्यावेळी इंजिना खालून धुर येत असल्याचे गेटमनने त्यांना सांगितले. त्यामुळे भटाटे यांनी ब्रेक बायडिंग चेक केले असता त्यांना दुरुस्त करण्याची गरज असल्याचे त्यांच्या ध्यानात आले. कल्याणहून ‘सीएनडब्ल्यू’ स्टाफ मागविण्यात वेळ न दवडता पॉईंट्समन भटाटे यांनी आपले बेसिक ट्रेनिंगचे कौशल्य वापरून मालगाडी दुरुस्त करीत मार्ग मोकळा केला. इंधन भरून मिरजहून आलेल्या बजूआला चाललेली मालगाडी सुखरूपपणे पुढील प्रवासासाठी रवाना केली. कोरोना संकट काळात त्यांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक होत आहे. रेल्वेची प्रवासी सेवा जरी ठप्प असली तरी मालगाडी आणि पार्सलची वाहतूक करुन रेल्वे देशसेवा करीत आहे.





























































