12 ज्योतिर्लिंगे निर्मनुष्य, पण हजारो भक्तांना मिळतेय ‘शिव’भोजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानातील 12 ज्योतिर्लिंगाची तीर्थक्षेत्रे कोरोनाच्या महामारीमुळे ओस पडली आहेत.एरव्ही गजबजणाऱया या देवालयांत फक्त पुजारी आणि मोजकेच सेवक भगवान शंकरांची पूजा आणि आरती करीत आहेत.पण या काळात ज्योतिर्लिंगाची ठिकाणे मात्र लॉकडाऊनमुळे एकवेळच्या जेवणालाही मोताद झालेल्या गोरगरीब गरजुंसाठीची जीवनदात्री ठरली आहेत.या मंदिरांनी चक्क भगवान शिवाचे रूप घेत रोज हजारो भुकेल्यांना पोटभर जेवण पुरवण्याचे कार्य सुरु ठेवले आहे.

देशातील 12 ज्योतिर्लिंगाच्या तीर्थक्षेत्रांना लाखो शिवभक्त प्रतिदिन भेट देतात.या भेटीत भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी भोग (पंचपक्वानांचा प्रसाद) अर्पण करण्याची भक्तांची परंपरा आहे.पण कोरोनाच्या महामारीला रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन लावल्यावर देशभरातील मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे भक्तांसाठी बंद ठेवण्यात आली आहेत.पवित्र ज्योतिलिंगेही या नियमाला अपवाद नाहीत.मात्र ज्योतिर्लिंगाची पूजा पुजारी प्रत्येक दिवशी करीत आहेत. केवळ अनुपस्थिती आहे ती शिवभक्तांची.या स्थितीत आता या ज्योतिर्लिंग देवस्थानांनी गरीब आणि अडलेल्या भक्तगणांसाठी मदतीचा हात देऊ केला आहे. हि देवस्थाने आपल्या भागातील गरजू जनतेला पोटभर जेवण पुरवीत आहेत. सात ज्योतिर्लिंग आपल्या विभागातील जनतेला घरोघरी अन्नाची पॅकेट्स रोज पुरवीत आहेत. तर अन्य देवस्थानांनी सरकारच्या कोविड -19 मदत निधीला मोठी आर्थिक मदत दिली आहे.