
आपल्या हातात सत्ता नाही म्हणून काही लोक सध्या अस्वस्थ आहेत. त्या नैराश्यापोटी ते सरकारविरोधात हॅशटॅग ट्रेंड करत आहेत, पण भाजपने काही प्रयत्न केले तरी ते सफल होणार नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे लोकांमध्ये जावून काम करत आहेत. त्यामुळे लोकांचा सरकारवर विश्वास आहे, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
भाजप राजकारणात मश्गुल
कोरोनासाठी येणारी मदत जर पंतप्रधान केअरला दिली तरच सीएसआर फंड म्हणून गणली जाईल. राज्य सरकारला दिली तर नाही. हे खोट्या प्रवृत्तीची लक्षणे आहेत. भाजप राजकारण करण्यात मश्गुल आहे हे देशातील जनतेला कळून चुकले आहे, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.
आर्थिक संकटाला हे सरकार तोंड देईल
राज्याच्या तिजोरीत सध्या काहीच नाही. मार्चमध्ये लोक मोठ्या प्रमाणात कर भरत असतात. मात्र, लॉकडाऊनमुळे लोकांना ते करता आले नाही. राज्याला आर्थिक चणचण भासणार आहे. तथापि महाराष्ट्र हे सक्षम राज्य आहे. आघाडी सरकारच्या नेतृत्वात महाराष्ट्र या संकटाला तोंड देईल असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.


























































