आरोग्य दूतांच्या संरक्षणासाठी…किऑस्क!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तीन मे 2020 पर्यंत लॉकडाऊन घोषित झाला आहे. आरोग्य क्षेत्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांपासून स्वच्छकांपर्यंत सर्व जण कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव परतवून लावण्यासाठी जीवाची बाजी लावत आहेत, अशा या आरोग्य क्षेत्रातील सैनिकांच्या संरक्षणासाठी धुळे येथील तरुण अभियंता संग्राम सुधीर लिमये यांनी कॅबिन तयार केली आहे. ती ‘कोरोना’ संशयित रुग्णांचे ‘स्वॅब’ नमुने घेताना उपयुक्त ठरत आहे.

लॉकडाऊनमुळे अपवाद वगळता सर्वच जण घरी आहेत. ‘द हिंदू’ वृत्तपत्र वाचताना लिमये यांचे एका बातमीकडे लक्ष वेधले गेले. ती बातमी होती, ‘कोरोना’ विषाणूच्या संशयित रुग्णांचे घशातील स्वॅबचे नमुने घेण्यासाठी किओस्क (बंदिस्त कॅबिन) तयार करण्यात आल्याची. लिमये यांचा धुळे येथील औद्योगिक वसाहतीत कस्टमाइझ इंटेरिअर डिझाईन आणि फर्निचरची फॅक्टरी आहे. त्यामुळे लिमये यांना कॅबिनची कल्पना आवडली. त्यांनी जिल्हा रुग्णालयातील डॉ. स्मितेश देसले यांच्याशी चर्चा केली. त्यांनी अधिष्ठाता डॉ. नागसेन रामराजे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एम. पी. सांगळे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर लिमये यांनी भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, धुळे यांना अशा प्रकारची कॅबिन देण्याची तयारी दर्शविली. याबाबत त्यांनी व्यवसायातील सहकारी विजय गवळे, अतुल कुलकर्णी, ग्राफिक डिझायनर श्याम अग्रवाल, जपानमध्ये वास्तव्यास असलेली बहीण व मेहुण्यांशी चर्चा केली.

त्यानंतर त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळा प्रमुख प्रा. डॉ. मृदुला द्रविड यांच्याशी संपर्क साधून अशा प्रकारची कॅबिन तयार करुन देण्याची तयारी दर्शविली. निधीचा प्रश्न उपस्थित झाल्यावर लिमये यांनी एक कॅबिन स्वखर्चाने बनवून देण्याची तयारी दर्शविली. त्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाने संमती पत्र दिले. मात्र, लॉकडाऊनमुळे लिमये यांची फॅक्टरी बंद होती. याबाबत त्यांना वैद्यकीय महाविद्यालयाने कॅबिन तयार करण्यासाठी पत्र दिले. तोपर्यंत लिमये यांनी डिझाईन तयार केले होते. तसेच फॅक्टरीतील कर्मचाऱ्यांशी चर्चा करून डिझाईन अंतिम केले. लांब ग्लोव्हजचा प्रश्न निर्माण झाला होता. ते कुठेच उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे लिमये यांनी रेनकोटचे हात कापून बसविले. तसेच पुढे नेहमीचे ग्लोव्हज लावले. त्यानंतर प्रात्यक्षिकाची प्रक्रिया पार पडली. अवघ्या 24 तासांत ही कॅबिन तयार झाली. त्यासाठी सुमारे 45 हजार रुपये खर्च आला. या कॅबिनमुळे कोरोनाबाधित संशयित रुग्णाच्या घशाचे स्वॅब घेणे सोशल डिस्टन्स ठेवून सोयीचे झाले आहे.