
सोलापुरात आत्तापर्यंत 692 कोरोना संशयितांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.यापैकी 630 अहवाल प्राप्त झाले आहेत. यात 605 जणांची चाचणी निगेटिव्ह आली आहे, तर 25 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
या 25 पैकी 2 दोन कोरोना रुग्णांचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे. 23 जणांवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज 67 जणाचे अहवाल प्राप्त झाले. यात 57 निगेटिव्ह तर 10 पॉझिटिव्ह अहवाल आहेत. यात पाच्छा पेठ परिसरातील 6 तर बापुजी नगर, कुर्बान हुसेन नगर, भद्रावती पेठ आणि जगन्नाथ पुरम येथील प्रत्येकी एक असे रुग्ण आढळून आले आहेत. हे सर्व परिसर पोलिसांनी बंदिस्त केले असून या भागातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे; ही माहितीही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
सोलापुरात सोमवारी दुपारी 2 वाजल्यापासून संचारबंदी लागू झाली आहे. हॉस्पिटल सुरू आहेत मात्र खासगी मेडिकल दुकान, किराणा भाजी फळ विक्री ही सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत पेट्रोल पंपावर ही फक्त अत्यावश्यक सेवेतील पाच धारकांनाच पेट्रोल दिला जात आहे. इतरांना पेट्रोल बंद करण्यात आल आहे. संचारबंदीचा अंमल काटेकोर व्हावा या दृष्टीने पोलिसांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत गल्लीबोळात गप्पा मारत बसणाऱ्यांना, गर्दी करणाऱ्यांना पोलीस हुसकावून लावत आहेत. काही ठिकाणी ताब्यातही घेण्यात आले.
या तीन दिवसाच्या संचारबंदी च्या काळात केवळ सकाळी दूध विक्रीसाठी सहा ते नऊ या वेळेत दूध विक्रेत्यांना सवलत आहे. नागरिकांना यानिमित्ताने दुसऱ्या कामासाठी घराबाहेर पडता येणार नाही. पंढरपूरमध्ये बुधवार गुरुवार आणि शुक्रवार असे तीन दिवस कडकडीत बंद ठेवण्याच्या हालचाली स्थानिक पातळीवर सुरू झाल्या आहेत.
























































